मानसिक परिपूर्णत्व – २२

 

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण अशी एक जागा नेहमीच असते की, जिथे सारे काही खुले, साधे, सरळ असते – हे अनुभवलेले सत्य मी सांगत आहे. तुम्ही गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहाता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरिक दृष्टिकोनातून तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते – अगदी सहजतेने हे होते.

मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी म्हणत असत, ‘साधे राहा, साधे असा. जे तुम्हाला भावते तसेच साधेपणाने बोला. साधे असा, साधे असा.’ त्यांचा त्यावर खूप भर असे. पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा एक प्रकाशपथच माझ्यासमोर खुला होताना मला दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एक पाऊल, मग दुसरे पाऊल, हेच केवळ आपल्याला करावयाचे आहे,’ असे मला जाणवून गेले.

श्रीमाताजी स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत म्हणतात, सारी जटिलता इथे आहे, खूप जटिल, त्याच्याशी मिळतेजुळते घेणे खूप अवघड आहे. जेव्हा श्रीअरविंद ‘साधेसरळ असा’, असे म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य – तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता आणि अचानकपणे व्यक्ती जणू प्रकाशाच्या बागेतच उदयाला यावी तसे काहीसे झाले.

जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती.

साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, अगदी साधे, सहज. अगदी साधेपणा.

…साधेसरळ असणे असे ते ज्याला म्हणत आहेत, ती म्हणजे अगदी आनंददायी उत्स्फूर्तता, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असा, साधे असा, सरळ असा. एक आनंदी अशी सहजता. ते ज्याला ‘दैवी स्थिती’ असे म्हणतात ती उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे.

आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही मोकळे होते.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple : September 16, 1961)

श्रीमाताजी