मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)

श्रीअरविंद