मानसिक परिपूर्णत्व – १८
(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्त्तर देत आहेत.)
या योगासारख्या (पूर्णयोगासारख्या) योगाला धीराची आवश्यकता असते कारण, ह्या योगामध्ये, प्रेरणांमधील आमूलाग्र बदल, प्रकृतीच्या प्रत्येक भागामध्ये आणि तपशीलांमध्ये परितर्वन या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. ”काल याच वेळेस मी श्रीमाताजींप्रत संपूर्ण आत्मदान करावयाचा निश्चय केला आणि बघा, तसे काहीच झालेले नाहीये; तर उलट, सगळ्या विरोधी गोष्टी पुन्हा एकदा उफाळून आल्या आहेत; तेव्हा आता अन्य काही नाही, मी योगासाठी अपात्र आहे असे गृहीत धरून, योगमार्गाचा त्याग करावयास हवा,” असे म्हणणे योग्य नाही. अर्थात, जेव्हा तुम्ही (संपूर्ण आत्मदान करण्याच्या निश्चयापाशी) अशा प्रकारचा काही निश्चय करण्याच्या मुद्द्यापाशी येऊन पोहोचलेले असता तेव्हा, मार्गामध्ये अडथळा येईल अशा साऱ्या गोष्टी ताबडतोब वर उफाळून येतात – हे असे अगदी हमखास घडते.
अशा वेळी, मागे सरायला पाहिजे, त्या गोष्टींचे निरीक्षण करून, त्यांचा त्याग करावयास हवा; अशा गोष्टींना तुमचा ताबा घेण्यास तुम्ही संमती देता कामा नये; तुम्ही तुमची मध्यवर्ती इच्छा त्यांच्यापासून अलिप्त अशी राखली पाहिजे आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीला आवाहन केले पाहिजे. आणि तरीसुद्धा जर व्यक्ती त्यामध्ये गुंतून पडली आणि असे बरेचदा घडते, तर अशा वेळी शक्य तितक्या त्वरेने त्यापासून अलिप्त होऊन, पुढे वाटचाल केली पाहिजे. प्रत्येक जण, प्रत्येक योगी हे असेच करत असतो. प्रत्येक गोष्ट त्वरेने करावयास जमत नाही म्हणून निराश होणे, हे जडभौतिक सत्याच्या काहीसे विरोधी आहे. व्यक्तीचे स्खलन झाले म्हणजे, याचा अर्थ ती व्यक्ती अपात्र आहे असा होत नाही. तसेच एखाद्या गोष्टीमध्ये एखादी अडचण दीर्घकाळ टिकून राहिली, तर ती गोष्ट त्या व्यक्तीसाठी अशक्यच आहे, असाही याचा अर्थ होत नाही.
जेव्हा तुम्ही निराश होता, तेव्हा तुम्हाला तुमचे नेहमीचे काम सोडून देणे भाग पडते, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही स्थिरता प्राप्त करून घेतलेली नाही. तर याचा अर्थ एवढाच की, जी स्थिरता तुम्हाला प्राप्त झाली आहे, ती स्थिरता हा तुमचा वैयक्तिक गुण नाही तर, तुम्ही श्रीमाताजींशी जो संपर्क राखू शकता, त्यावर तो गुण अवलंबून आहे. कारण त्याच्या पाठीशी आणि तुम्ही जी काही प्रगती करू शकता, त्या सर्व प्रगतीच्या पाठीशी श्रीमाताजींची शक्ती असते. त्या शक्तीवर अधिकाधिक विसंबून राहायला शिका, त्या शक्तीप्रत अधिकाधिक पूर्णतेने स्वतःला खुले करा आणि ज्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही प्रयत्नशील असता, ती प्रगतीसुद्धा स्वतःसाठी नाही तर ईश्वराखातर करत आहात, हे लक्षात ठेवा – जर असे केलेत, तर तुम्ही या मार्गावर सहजतेने प्रगत होऊ शकाल. अगदी बाह्यवर्ती शारीर जाणिवेमध्येसुद्धा पूर्णपणे चैत्य खुलेपणा राखा.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 113-114)
- ईश्वराचे दर्शन - September 8, 2024
- अतिमानसाची आवश्यकता - September 7, 2024
- अनुभूती आणि साक्षात्कार - September 3, 2024