मानसिक परिपूर्णत्व – ०३

 

….आध्यात्मिक प्रयत्नांसाठी प्रामाणिकपणा ही अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कुटिलता हा कायमस्वरूपी अडथळा आहे. सात्विक प्रवृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि तयार अशी मानण्यात आली आहे, तर राजसिक प्रवृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून जाते. त्याच वेळी हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कशाची आवश्यकता असेलच तर ती, ऊर्ध्वमुख अभीप्सेची असते.

आणि ही अभीप्सा (Aspiration) सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्विक प्रवृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ईश्वरी शुद्धता, प्रकाश आणि प्रेमाप्रत वळू शकते. अर्थात, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून ती फेकून देईल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गभ्रष्ट होण्याची पण शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती त्यामध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रुपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई, बिल्वमंगल आणि त्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ईश्वराच्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात मग त्या माणसाच्या भूतकाळातील ठोकरा किंवा चुका किती का असेनात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर अनुक्रमे असणारी तेजस्वी व काळोखी आवरणे होत. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, ती दोन्ही आवरणे चांगली भाजून निघतात.

ईश्वरासमोरील विनम्रता ही देखील आध्यात्मिक जीवनाची एक अनिवार्य अट आहे आणि आध्यात्मिक गर्व, उद्धटपणा किंवा घमेंड आणि स्वतःवरील फाजील विश्वास या गोष्टी नेहमीच खाली खेचणाऱ्या असतात. या मार्गावरील अडचणी लक्षात घेता, ईश्वरावरील विश्वास आणि स्वतःच्या आध्यात्मिक नियतीवरील श्रद्धा (म्हणजे, मी अंतःकरणपूर्वक, जीवाच्या निकराने ईश्वराचा शोध घेत आहे; त्यामुळे एक ना एक दिवस मी त्याच्यापर्यंत पोहोचेनच हा विश्वास) या गोष्टी खूपच आवश्यक असतात. ईश्वर सगळ्यांमध्येच असल्यामुळे, इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टीला येथे थाराच नाही. अंतिमतः, माणसाच्या कृती आणि आकांक्षा या कधीच क्षुल्लक आणि निरुपयोगी असत नाहीत कारण, सगळे जीवन म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे चाललेली जीवाची वाटचाल असते. आमचा दृष्टिकोन असा आहे की, राजकारण, सामाजिक सुधारणा, परोपकार यांसारख्या मानवाने स्वीकारलेल्या कोणत्याही सामान्य मार्गाने, मानवता स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तात्पुरती केलेली मलमपट्टी असते. यातून खरी सुटका ही जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्यावरच घडून येते; व्यक्ती आपल्या जीवाच्या अधिक महान, अधिक व्यापक आणि अधिक विशुद्ध अशा पद्धतीत परिवर्तित होईल आणि त्यावर आधारित कृती करू लागेल, जीवन जगू लागेल तेव्हाच यामधून सुटका घडून येते. एकदा का आध्यात्मिक दिशा निश्चित झाली की मग, व्यक्तीने आपली सारी ऊर्जा त्या दिशेनेच वळविली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 42-43)

श्रीअरविंद