विचारस्पंदने
एकत्व – ०८
भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना सांगत असत की, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे स्पंदन वातावरणामध्ये सोडता, उदाहरणार्थ एखादी इच्छा, एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयीची इच्छा, तेव्हा ती इच्छा एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे, दुसऱ्या व्यक्तिकडून तिसऱ्या व्यक्तिकडे अशी जगभर संक्रमित होत जाते आणि नंतर ती फिरून परत तुमच्यापाशीच येते. आणि वातावरणात सोडलेली ती काही एकमेव अशी गोष्ट नसते, तर गोष्टींचे एक आख्खे विश्वच असते आणि पुन्हा असे की, तुम्ही या विश्वातील प्रक्षेपण करणारे एकमेव केंद्र नसता तर, प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रक्षेपणाचे एक केंद्र असते – तेव्हा हा एवढा गोंधळ असतो की, तुम्ही तुमची भूमिकाच तेथे गमावून बसता. परंतु ही सर्व स्पंदनं अगदी एकाच, अगदी एकसारख्या क्षेत्रातूनच संक्रमित होत असतात. केवळ त्या स्पंदनांचे एकमेकांवर धडकणे, त्यांची व्यामिश्रता, यामुळे काहीतरी वेगळे, स्वतंत्र असल्याची भावना तुम्हाला होते.
स्वतंत्र, अलग असे काहीच नसते. एकच एक मूलद्रव्य आहे, एकच शक्ती आहे, एकच चेतना आहे, एकच संकल्प आहे जो अगणित अशा व्यक्तिमत्त्वांमधून संचार करत असतो. हे इतके गुंतागुंतीचे आहे की, व्यक्तिला त्याची जाणच नसते, परंतु जर व्यक्ती थोडी मागे सरकेल आणि त्या विचारप्रवाहाचा मागोवा घेत जाईल, मग तो विचारप्रवाह कोणता का असेना, तेव्हा व्यक्तिच्या लक्षात येईल की, ही विचारस्पंदनेच स्वतः एकातून दुसरे या पद्धतीने फैलावत जातात. वस्तुतः प्रत्यक्षात तेथे एकमेव एकत्व असते – मूलद्रव्याचे एकत्व, चेतनेचे एकत्व, संकल्पाचे एकत्व. येथे एकच एक सत्यता आहे. बाह्यतः एक प्रकारचा आभास असतो. अलगपणाचा, वेगळेपणाचा आभास असतो.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 52-53)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025