एकत्व – ०६

 

भांडणं न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते. असे म्हणणे हे काहीसे विचित्र वाटेल कारण गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडाभांडी करणे, मग ती उघडपणे असोत किंवा छुपी असोत, हाच असतो. आपण अगदी प्रत्येक वेळीच बाचाबाची करतो असे नाही, किंवा अगदी हमरीतुमरी वर येतो असेही नाही – सुदैवाने – पण आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता कारण, तुम्हाला स्वतःमध्ये जी परिपूर्णता आणावयाची इच्छा असते ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडत नाही. वास्तविक ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे तुम्हाला देखील अवघड असते – परंतु तुम्हाला मात्र असे वाटत असते की, ती इतरांनी प्रत्यक्षात आणलीच पाहिजे.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन हे अधिक शांतिपूर्ण आणि अधिक प्रभावीदेखील असेल. कारण जी परिपूर्णता तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ती तुम्हाला इतरांमध्ये दिसली नाही तर, तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये निश्चितपणे तुमच्यामधील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही गमावून बसता.

इतरांनी परिपूर्णता प्रत्यक्षात उतरवली पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि जे उद्दिष्ट वास्तविक तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी तुम्ही क्वचितच जागरुक असता. जर तुम्ही त्याविषयी जागरुक झालात, म्हणजे, तुम्हाला जे नेमून देण्यात आले आहे ते कार्य करावयास तुम्ही सुरुवात केलीत तर, म्हणजे, तुमचे जे काही कर्तव्य आहे ते प्रत्यक्षात आणावयास सुरुवात केलीत तर, इतर काय करतात, याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही. आणि खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगावयाचा झाला तर तो हाच की, “जे कोणी माझ्या अवतीभोवती आहेत, जी कोणती परिस्थिती जीवनात माझ्या वाट्याला आली आहे, माझ्या जवळच्या असणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या म्हणजे, मी कोणती प्रगती करावयास हवी हे मला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतनेने माझ्यासमोर धरलेले आरसेच आहेत. इतरांच्या जर कोणत्या एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, मला ते कार्य माझ्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.”

आणि जर व्यक्ती स्वतःमध्ये अशी खरीखुरी परिपूर्णता बाळगेल तर व्यक्तिला तीच परिपूर्णता बऱ्याचदा इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 22-23)

श्रीमाताजी