एकत्व – ०२
आपण जर एखाद्या धार्मिक संघटनेचे उदाहरण घेतले – तर त्या संघाचे प्रतीक म्हणजे मठासारख्या वास्तुरचना, एकसमान पोषाख, एकसमान उपक्रम, एकसमान हालचालीसुद्धा असतात. मी अधिक स्पष्ट करून सांगते. प्रत्येकजण एकसारखाच गणवेश परिधान करेल, प्रत्येक जण सकाळी ठरावीक वेळीच उठेल, एकसारख्याच प्रकारचे अन्नग्रहण करेल, एकत्रितपणे येऊन समानच प्रार्थना करतील इ. ह्याला एक सर्वसाधारण अशी एकसमानता म्हणता येईल. आणि साहजिकपणेच, आंतरिकदृष्ट्या तेथे जाणिवांचा गोंधळ आढळून येतो, कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागत असतो. ही अशी एकरूपता जी विश्वास आणि विशिष्ट मतप्रणालीवर आधारित असते ती, सर्वस्वी ‘आभासी एकरूपता’ असते.
माणसांमध्ये ही अशी सामूहिकता नेहमी पाहावयास मिळते. समूहाने एकत्र यायचे, संबंधित राहायचे, एखाद्या समान आदर्शाभोवती, समान कृतीभोवती, समान साक्षात्काराभोवती एकसंघ राहावयाचे पण हे सारे काहीशा कृत्रिम पद्धतीने चालते. याउलट, श्रीअरविंद येथे खराखुरा समुदाय काय असतो ते सांगत आहेत – त्याला त्यांनी ‘विज्ञान वा अतिमानसिक समुदाय’ असे म्हटले आहे – असा हा समुदाय त्यातील प्रत्येक घटकाच्या आंतरिक साक्षात्काराच्या पायावरच उभा राहू शकतो. त्यातील प्रत्येक घटक हा त्या समुदायातील इतर घटकांबरोबरच्या खऱ्याखुऱ्या, मूर्त अशा एकात्मतेसाठी, एकरूपतेसाठी झटत असतो. म्हणजे असे की, समुदायातील इतर सर्व घटकांशी या ना त्या प्रकारे एखादा घटक जोडला गेलेला आहे, असे नव्हे; तर, त्यातील प्रत्येक घटक हा इतरांशी आंतरिकरित्या, सगळेजण म्हणजे जणू एकच आहेत ह्या पद्धतीने जोडलेला असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी इतर घटक हे जणूकाही त्याच्या स्वतःच्या शरीराप्रमाणेच असतील, केवळ मानसिकरित्या, कृत्रिमपणाने नाही तर, एका आंतरिक साक्षात्काराद्वारा, चेतनेच्या वास्तविकतेच्या द्वारे देखील ते तसेच असतील.
म्हणजे, ही अतिमानसिक सामुदायिकता प्रत्यक्षात उतरविण्याची आशा बाळगण्यापूर्वी, आधी प्रत्येक व्यक्तीने विज्ञानमय अस्तित्व बनावयास हवे किंवा किमान ते बनण्याकडे वाटचाल तरी केली पाहिजे. हे तर उघडच आहे की, व्यक्तिगत कार्य हे आधी पुढे गेले पाहिजे आणि सामुदायिक कार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे होते की, कोणत्याही अमुक एखाद्या इच्छेच्या हस्तक्षेपाविनाही, सहजगत्या, व्यक्तिगत प्रगती ही समुहाच्या अवस्थेमुळे नियंत्रित केली जाते, रोखली जाते. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यामध्ये परस्परावलंबित्व असते आणि व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरीही, व्यक्ती त्यापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. आणि अगदी एखाद्या व्यक्तीने, ह्या पूर्णयोगात जरी स्वतःला पार्थिव आणि मानवी जाणिवेच्या स्थितीच्या अतीत होऊन, मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरीही, किमान अवचेतनेमध्ये तरी, ती व्यक्ती समूहाच्या स्थितीमुळे बांधली जाते, समूहाची स्थिती एखाद्या रोधकाप्रमाणे काम करते आणि खरंतर ती मागे खेचते. व्यक्तीने कितीही वेगाने जाण्याचा प्रयत्न केला तरी, सर्व आसक्ती आणि जबाबदाऱ्यांचे ओझे टाकून देण्याचा प्रयत्न केला तरी, अगदी काहीही असले तरीसुद्धा, अगदी एखादी व्यक्ती शिखरस्थानी असली तरीसुद्धा आणि उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये ती सर्वात पुढे असली तरीसुद्धा, सर्वांच्या साक्षात्कारावर, या पृथ्वीनिवासी समुदायाच्या स्थितीवर त्याचा साक्षात्कार अवलंबून असतो. आणि यामुळे खरोखरच व्यक्ती मागे खेचली जाते. इतकी मागे खेचली जाते की, जे घडवून आणायचे आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी, या पृथ्वीची तयारी होण्यासाठी, कधीकधी व्यक्तीला शतकानुशतके देखील थांबावे लागते.
म्हणूनच श्रीअरविंद असे म्हणतात, दुहेरी प्रक्रिया आवश्यक आहे. व्यक्तीच्या प्रगतीचे आणि साक्षात्काराचे प्रयत्न हे समग्र समुहाच्या उत्थानाच्या प्रयत्नांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत, कारण व्यक्तीच्या महत्तर प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. त्याला सामुहिक प्रगती असे म्हणता येईल, ह्या प्रगतीमुळे व्यक्तीला अजून एक पाऊल पुढे टाकणे शक्य होईल.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 141-42)
- साधना, योग आणि रूपांतरण – १५४ - November 5, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १५२ - November 3, 2024
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०२ - September 30, 2024