प्रश्न : धर्माचे स्वरूप नेमके काय आहे? आध्यात्मिक जीवनमार्गातील तो अडथळा आहे का?

श्रीमाताजी : मानवतेच्या उच्चतर मनाशी धर्माचा संबंध असतो. मानवाचे उच्च मन, त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असते. मानव ज्याला ईश्वर वा चैतन्य वा सत्य वा श्रद्धा वा ज्ञान वा अनंत, केवल अशा नावांनी संबोधतो, ज्याच्या पर्यंत मानवी मन पोहोचू शकत नाही, पण तरीही तेथे पोहोचण्याचा ते प्रयत्न करत राहते, त्या प्रयत्नाला ‘धर्म’ ही संज्ञा आहे.

धर्म हा त्याच्या मूळ उगमापाशी दिव्य, ईश्वरी असू शकतो पण त्याचे व्यवहारातील स्वरूप हे ईश्वरी नसून मानवी असते. वस्तुत: आपण एक धर्म असे न म्हणता अनेक धर्मांविषयी बोलले पाहिजे कारण माणसांनी अनेक धर्मांची स्थापना केली आहे…..

सर्व धर्मांची गोष्ट एकसारखीच आहे. एखाद्या महान गुरुचे या भूतलावर येणे हे धर्माच्या उदयाचे निमित्त असते. तो येतो, तो त्या दिव्य सत्याचा अवतार असतो आणि तो ती दिव्य सद्वस्तु उघड करून दाखवितो; पण माणसं त्याचाच ताबा घेतात, त्याचा व्यापार मांडतात, एखादी राजकीय संघटना असावी तशी त्याची अवस्था करून टाकतात. मग अशा धर्माला शासन, धोरणे, नियम, पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, सणसमारंभ, उत्सव यांनी सजवले जाते आणि या साऱ्या गोष्टी त्या त्या धर्मीयांसाठी जणूकाही निरपवाद व अनुल्लंघनीय अशा बनून जातात. तेव्हा मग धर्म देखील एखाद्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच, त्याच्या निष्ठावान लोकांना बक्षिस देतो आणि जे बंडखोरी करतात किंवा जे धर्मापासून भरकटतात, जे पाखंडी आहेत, जे त्या धर्माचा त्याग करतात, त्यांना तो शिक्षा सुनावतो.

प्रस्थापित आणि अधिकृत अशा कोणत्याही धर्माचा पहिला आणि मुख्य सांगावा हाच असतो की, “माझे तत्त्व सर्वोच्च आहे, तेच एकमेव सत्य आहे, आणि इतर सारे मिथ्या वा गौण आहे.” कारण अशा प्रकारच्या ह्या मूलभूत सिद्धान्ताशिवाय, प्रस्थापित संप्रदायवादी धर्म अस्तित्वातच आले नसते. तुम्हाला एकट्यालाच सर्वोच्च सत्य गवसले आहे किंवा तुम्ही एकट्यानेच त्या ‘एका’ला कवळले आहे अशी जर तुमची खात्री नसेल आणि जर तुम्ही तसा दावा केला नाहीत तर तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यांना तुमच्याभोवती गोळा करू शकत नाही. धार्मिक मनुष्याचा हा असा अगदी स्वाभाविक दृष्टिकोन असतो; पण त्यामुळेच धर्म हा आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावरील अडथळा म्हणून समोर उभा ठाकतो.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 76-77)

श्रीमाताजी