पूर्णयोग आणि बौद्धमत – १९
(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)
धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.
श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.
या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.
हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.
त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.
स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.
ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.
वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024