पूर्णयोग आणि बौद्धमत – १५

धम्मपद : जी सावधचित्त व्यक्ती परित्याग आणि एकांतवास यामध्ये समाधानी होऊन जीवन जगते तिचा, जी जागृत झालेली आहे अशा व्यक्तीचा, आणि जे सत्पुरुष ध्यानधारणा करतात अशा साऱ्या व्यक्तींचा देवालासुद्धा हेवा वाटतो.

श्रीमाताजी : जेव्हा तुम्हाला थोडासा रिकामा वेळ असतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, स्वत:ला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ ध्यानासाठी, विखुरलेल्या ‘मी’ चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे प्रयोजन जगण्यासाठी, सत्य आणि शाश्वताप्रत स्वत:ला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे.” जेव्हा तुम्ही बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता अशा प्रत्येक वेळी तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तर, तुम्ही ह्या मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. तुमचा वेळ वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये, तुमची जाणीव ज्यामुळे निम्नतर पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये घालविण्यापेक्षा; तुम्हाला चंचल, विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच खऱ्या कारणांसाठी वेळ खर्च करणे अधिक उत्तम. कारण वेळ मुळातच इतका कमी असतो, आणि तो अधिकच कमी असल्याचे लक्षात येते. जेव्हा जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, मिळालेली संधी तीनचतुर्थांश वेळेला तुम्ही गमावलेली आहे – अशा वेळी तुम्ही मिळालेल्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्यानेही काही उपयोग होत नाही – त्यापेक्षा मध्यममार्गी, समतोल, चिकाटीने, शांतपणे काम करीत राहणे आणि तुम्हाला देण्यात आलेली कोणतीही संधी न गमावणे, म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या क्षणाचा वापर खऱ्या कारणासाठी खर्च करणे हे अधिक उत्तम.

जेव्हा तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता, तुम्ही सैरभैर होता, तुम्ही मित्रमैत्रिणींना भेटता, फिरायला जाता, परत लक्षात घ्या, मी येथे फक्त त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत आहे, ज्या गोष्टी करताच कामा नयेत त्यांच्याविषयी तर मी बोलतच नाहीये. ते करीत बसण्यापेक्षा, विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली वा समुद्रासमोर किंवा झाडांखाली शांतपणे बसा, आणि पुढील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा – आपण का जगतो हे समजून घ्या, आपण कसे जगायला हवे हे शिका, तुम्हाला जीवनात काय करावेसे वाटते आणि त्यासाठी तुम्ही काय करावयास हवे ह्याचे चिंतन करण्यात, तसेच ज्यामध्ये तुम्ही जगत असता त्या अज्ञान, मिथ्यत्व आणि दु:खभोग यांपासून सुटका करून घेण्याचा उत्तम मार्ग कोणता, या साऱ्या गोष्टींचे आकलन करून घेण्यामध्ये, त्या प्रत्यक्षात उतरविण्यामध्ये वेळ खर्च करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 250-251)

श्रीमाताजी