पूर्णयोग आणि बौद्धमत – १४

धम्मपद : अज्ञानी मनुष्य हा नुसताच एखाद्या बैलाप्रमाणे वयाने वाढत राहतो, त्याचे वजन वाढते पण त्याची बुद्धी विकसित होत नाही.

जे आत्म-नियंत्रित जीवन जगत नाहीत आणि ज्यांना त्यांच्या तरुणपणी, खरी संपत्ती कशी जमा करावी ते माहीत नसते असे लोक, ज्या तळ्यामध्ये मासे नाहीत त्या तळ्याकाठी राहणाऱ्या वृद्ध बगळ्याप्रमाणे नामशेष होतात.

श्रीमाताजी : येथे एक गोष्ट सांगितलेली नाही पण ती इतर गोष्टींइतकीच महत्त्वाची आहे. ती अशी की, असे एक म्हातारपण आहे की जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा उन्नती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता, म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात, की जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रुपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर, आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची, अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत, असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)

श्रीमाताजी