पूर्णयोग आणि बौद्धमत – ०९

धम्मपद : अशा रीतीने सावधानता, जागृती म्हणजे काय हे समजल्यानंतर, मुनी लोक त्यातच आनंद मानतात, व पूर्वसुरींच्या, श्रेष्ठ लोकांच्या उपस्थितीमध्ये आनंद मिळवितात.

श्रीमाताजी : या संपूर्ण शिकवणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती अशी की : उत्तम जीवन जगणे किंवा चांगला विचार करणे हा खूप प्रयासांचा वा त्यागाचा परिणाम असतो, असे तुम्हाला सांगण्यात आलेले नाही; उलटपक्षी, उत्तम जीवन जगणे ही अशी एक आनंदमय स्थिती आहे की, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या दुख:भोगांवर उपाय सापडतो, दुःखभोग दूर होतात. त्याकाळी, म्हणजे बुद्धांच्या काळात, आध्यात्मिक जीवन जगणे ही एक आनंदमय, सौंदर्यपूर्ण आणि परमानंदाची स्थिती होती, की जी तुम्हाला या पार्थिव जगताच्या सर्व समस्या, दुःखभोग, चिंता, काळज्या यांपासून मुक्त करून आनंदी, समाधानी, संतुष्ट बनवीत असे.

आधुनिक काळातील जडवादाने, आध्यात्मिक साधना करणे म्हणजे कठीण संघर्ष आहे; आध्यात्मिक साधनेसाठी जीवनातील सर्व तथाकथित मौजमजा, आनंद यांचा परित्याग करावा लागतो, वेदनादायक सर्वसंगपरित्याग करावा लागतो, अशी आपली समजूत करून दिली आहे.

मानवी संस्कृतीच्या जडवादी, भौतिकवादी दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून, भौतिक सुखसमृद्धी, भौतिक मौजमजा, भौतिक सोयीसुविधा, केवळ भौतिक जगताचेच अस्तित्व मान्य करणे, या गोष्टींवर आता अधिक भर देण्यात येऊ लागला आहे. प्राचीन काळात ह्या गोष्टीचा विचारच मनाला शिवत नसे. उलट, निवृत्ती, ध्यानधारणा, सर्व भौतिक काळज्या, चिंता यांपासून सुटका, आध्यात्मिक आनंदासाठी जीवनाचे समर्पण ह्यातच खराखुरा आनंद सामावलेला असे. ह्या दृष्टिकोनातून विचार केला असता, मानववंश प्रगतिपथापासून खूप दूर आहे, असेच म्हणावे लागेल. आणि ज्यांचा जन्म या जडवादी संस्कृतीचे आगारच म्हणावे अशा ठिकाणी झाला आहे अशा लोकांच्या अबोध मनात एका भयंकर कल्पनेने घर केले आहे, ती कल्पना अशी की : भौतिक गोष्टीच खऱ्या आहेत आणि ज्यांना वास्तवाचा, भौतिकाचा आधार नाही, ज्या भौतिकाशी संबंधित नाहीत अशा गोष्टी म्हणजे महत्प्रयासाचे काम आहे, त्यामध्ये फार मोठा जीवनाचा त्याग अंतर्भूत आहे असे त्यांना वाटते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसरात्र क्षुल्लक अशा भौतिक सुखसोयी, भौतिक आनंद, भौतिक इंद्रियसुख, भौतिक कामांमध्ये गुंतलेले नसणे म्हणजे तो जणू काही अद्भुत, जगावेगळा जीव आहे असे त्यांना वाटते. आपल्याला कळत नाही, पण संपूर्ण आधुनिक संस्कृती ह्या संकल्पनेवर आधारलेली आहे : ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करू शकता, तिच्या सत्यतेविषयी तुम्हाला खात्री असते; जी गोष्ट तुम्ही पाहू शकता तिच्या सत्यतेविषयी तुम्हाला खात्री असते; पण त्याव्यतिरिक्त इतर गोष्टी म्हणजे केवळ कल्पनाविलास तर नाही ना आणि आपण ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे तर लागत नाही ना ?’ असे त्यांना वाटते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 203-204)

श्रीमाताजी