धम्मपद : नीट शाकारणी न केलेल्या छपरातून जसे पावसाचे पाणी आत घुसते, तसेच असंतुलित मनामध्ये वासनाविकार, भावनावेग आत शिरतात.

श्रीमाताजी : चीनमध्ये, जपानमध्ये, ब्रह्मदेशात बौद्ध धर्माचे निरनिराळे पंथ अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक पंथ आपापल्या साधनापद्धतींचे अनुसरण करीत असतो. पण मन शांत करणे हीच ज्यांची एकमेव साधनापद्धती आहे, अशा लोकांचा पंथ हा त्यांपैकी सर्वात जास्त दूरवर पसरलेला आहे.

ते दिवसा काही तास आणि रात्रीदेखील ध्यानास बसतात आणि मन शांत करतात. – न भटकणारे, तास न् तास शांत राहू शकणारे अविचल मन ही त्यांच्यासाठी सर्व साक्षात्काराची गुरुकिल्ली असते. ही साधी सोपी गोष्ट असते असे मात्र तुम्ही समजू नका. त्यांच्यापुढे दुसरे कोणतेच उद्दिष्ट नसते. ते कोणत्या एखाद्या विचारावर मन एकाग्र करीत नाहीत, आकलन अधिक उत्तम असावे, अधिक ज्ञान मिळवावे असा कोणताच प्रयत्न ते करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीने एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे मन निश्चल-नीरव करावयाचे. मन शांत करावयाचे, ते पूर्णतया शांत आणि नि:स्तब्ध करावयाचे; या परिणामाप्रत पोहोचण्यासाठी त्यांना कधीकधी तर वर्षेच्या वर्षे खर्ची घालावी लागतात. धम्मपदात येथे सांगितल्याप्रमाणे, जर मन असंतुलित असेल, तर कल्पना एकापाठोपाठ एक या पद्धतीने सतत उसळत राहतात, कधीकधी त्यामध्ये कोणताही विशिष्ट क्रम नसतो, त्या परस्परांना विसंगत वा विरोधी असतात. घटनांविषयी त्यांच्या काही विशिष्ट धारणा असतात, आणि त्यांचा डोक्यात धिंगाणा चाललेला असतो, आणि त्यामुळे जणूकाही छपराला भोकं पडतात. आणि गळक्या छपरातून जसे घरात पाणी आत शिरते त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अनिष्ट लहरी, जाणिवेमध्ये आत शिरतात.

काहीही असले तरी, मन शांत करणे, स्तब्ध, निस्तरंग करणे ह्यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे, प्रत्येकालाच सुचवावी अशी ही साधनापद्धती आहे असे मला वाटते. जो मानसिकदृष्ट्या अधिक विकसित असेल, प्रगत असेल त्याला ही गोष्ट पटकन साध्य होते आणि मन अगदी प्राथमिक अवस्थेत असेल तर, ती गोष्ट अधिक अवघड असते, हे कोणालाही पटेल.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 195)

श्रीमाताजी