हा बारा बाजू असणारा रेखीव असा एक प्रकारचा मनोरा आहे, जो वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे. तो संपूर्णतया रिकामा आहे… शंभर-दोनशे लोक सामावू शकतील एवढी त्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर, आतल्या बाजूला, (बाहेरून नव्हे) छताला आधार देणारे बारा स्तंभ असतील, आणि अगदी मधोमध, जिच्यावर चित्त एकाग्र करावयाचे अशी वस्तु असेल. आणि संपूर्ण वर्षभर, सूर्याने किरणांच्या रूपात आत प्रवेश करावा : ते प्रकाशाचे विकिरण (Diffusion) नसेल. सूर्याचा प्रवेश किरणांच्या रूपातच होईल, अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. त्यानंतर, दिवसाच्या घटिकेनुसार व वर्षातील महिन्याप्रमाणे, सूर्यकिरण फिरेल. दिशा बदलली तरीसुद्धा सूर्यकिरण थेट मध्यभागीच पडत राहतील अशा पद्धतीने त्यांना दिशा दिली जाईल. (छताच्या वरच्या अंगास तशी व्यवस्था करण्यात येईल) केन्द्रभागी, पृथ्वीगोलाला आधार देत असेल अशा पद्धतीने, श्रीअरविंदांचे प्रतीक (Symbol) असेल. हा पृथ्वीगोल स्फटिक-सदृश पारदर्शक गोष्टीपासून तयार करण्याचा प्रयत्न आपण करावयास हवा….. एक मोठा पृथ्वीगोल. मग लोकांना ध्यानासाठी आत सोडण्यात येईल. कोणतेही ठराविक स्वरूपाचे असे ध्यान असणार नाही, परंतु लोकांनी तेथे शांततेने आणि एकाग्र होऊन…शांतीमग्नतेत राहणे आवश्यक आहे.

हे स्थान शक्यतो अगदी साधेसे असेल. आणि तेथील जमीन.. (Flooring) आरामदायी असेल.

आणि मधोमध जमिनीवर माझे प्रतीक (Symbol) असेल. माझ्या प्रतीकाच्या मधोमध, चार भागांमध्ये एखाद्या चौरसाप्रमाणे, श्री अरविंदांची चार प्रतीके असतील; ती सरळ उभी असतील, आणि पारदर्शक पृथ्वीगोलाला त्यांनी तोलून धरलेले असेल, आधार दिलेला असेल, असे मला दिसले आहे.

(CWM 13 : 284-285)

श्रीमाताजी