बहुतेक जण त्यांना जे काही हवे असते त्यालाच सत्य असे नाव देतात. सत्य काही का असेना, ऑरोविलवासीयांनी त्या परमसत्याची आस बाळगावयास हवी. धर्म कोणताही असो, प्राचीन वा अर्वाचीन, नवीन वा भावी, ज्याने अशा सर्व धर्मांचा परित्याग केला आहे व मूलत: जे दिव्य जीवन जगण्याची इच्छा बाळगतात अशा लोकांकरता ऑरोविल आहे.

‘सत्या’चे ज्ञान केवळ अनुभूतीनेच होऊ शकते.

भगवंताची अनुभूती येत नाही तोवर कोणीही भगवंताविषयी बोलू नये. ईश्वराची प्रचिती घ्या; त्यानंतरच तुम्हाला त्याविषयी बोलण्याचा अधिकार असेल.

मानवी जाणिवांच्या विकासाच्या ऐतिहासिक अभ्यासाचा एक भाग म्हणून धर्मांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येईल.

धर्म हे मनुष्यजातीच्या इतिहासाचा एक भाग आहेत; विधिनिषेधात्मक श्रद्धा वा विश्वास ह्या दृष्टीने नव्हे, तर मानवाला एका अधिक श्रेष्ठ अशा साक्षात्काराच्या दिशेने नेणारा मानवी जाणिवेच्या विकासप्रक्रियेतील एक भाग अशा रूपात ऑरोविलमध्ये त्याचा अभ्यास केला जाईल.

*

आमचे संशोधन हे गूढ मार्गांचा प्रभाव असणारा शोध असणार नाही. प्रत्यक्ष ह्या जीवनामध्येच भगवंताचा शोध घेणे ही आमची मनोकामना आहे आणि ह्या शोधाच्या माध्यमातूनच जीवनाचे खरेखुरे रूपांतरण होऊ शकते…

– श्रीमाताजी
(CWM 13 : 206)

आपल्याला जीवन परिवर्तित करावयाचे आहे. आपल्याला त्यापासून पळून दूर जावयाचे नाही… ज्याला देव म्हणतात त्याला जाणून घेण्याचा, त्याच्या सान्निध्यात येण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी त्यांनी जीवनाचा त्याग केला आहे. ते असे म्हणतात, ‘जीवन हे आध्यात्मिक प्रगतीत एक अडथळा आहे. ईश्वरप्राप्तीकरता जीवनाचा त्याग करायलाच हवा.” म्हणून, तुम्हाला भारतात सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी दिसतात; युरोपमध्ये भिक्षु आणि तपस्वी दिसतात. ठीक आहे, ते तात्पुरती सुटका करुन घेऊ शकतात. पण तरी, जेव्हा त्यांचा पुन्हा जन्म होतो तेव्हा त्यांना पुन्हा पहिल्यापासून सगळ्याची सुरुवात करावी लागते. जीवन आहे तसेच राहते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 333-334)

संवादक : “कोणतेही नियम वा कायदे केले जाणार नाहीत. जसेजसे ऑरोविलचे गर्भित सत्य उदयास येत जाईल आणि ते हळूहळू आकार घेऊ लागेल, तसतशा गोष्टी नियमबद्ध होत जातील. आम्ही आधीपासूनच कशाचीही अटकळ बांधत नाही.”

श्रीमाताजी : मला असे म्हणायचे आहे की, सर्वसाधारणपणे – आत्तापर्यंत तरी आणि आता तर अधिकाधिकपणे – माणसं त्यांच्या त्यांच्या संकल्पनांनुसार, त्यांच्या त्यांच्या आदर्शानुसार, मानसिक नियम तयार करतात आणि ते जगावर लादतात. पण हे अगदी मिथ्या आहे, बेताल आहे, असत्य आहे – आणि त्याचा परिणाम असा होतो की गोष्टी बंड तरी करतात किंवा प्राणहीन होतात आणि नाहीशा होतात… जीवनानुभवच असे सांगतो की, नियम हे हळूहळू उलगडत गेले पाहिजेत आणि ते सतत प्रगतिशील राहू शकतील इतके लवचिक व शक्य तितके व्यापक असले पाहिजेत. काहीच ठरीव नसावे.

शासनकर्त्यांची ही मोठी चूक होते; ते एक चौकट तयार करतात आणि म्हणतात, “आम्ही असे असे नियम तयार केले आहेत आणि आता आपण त्यानुसार जगले पाहिजे.” आणि अशा रीतीने ते जीवनाचा चुराडा करतात आणि त्याला प्रगत होण्यापासून रोखतात. खरेतर नियम असे असावेत, जे शक्य तितके सर्वसमावेशक असतील की ज्यामुळे ते अतीव लवचिक आणि गरजांनुरुप बदलू शकतील आणि गरजा व सवयी जेवढ्या त्वरेने बदलतात तेवढ्याच त्वरेने ते नियम बदलू शकतील, अशा नियमांची हळूहळू बांधणी करत करत जीवनाने स्वत:च प्रकाश, ज्ञान, शक्ती या दिशेने प्रगत व्हावयास हवे.

(मौन)

बुद्धीच्या मानसिक शासनाची जागा आध्यात्मिकीकरण (Spiritualised) झालेल्या जाणिवेच्या शासनाने घेणे येथवर ही समस्या येऊन पोहोचते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 267)

संवादक : “ऑरोविलमधील रहिवासी तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील.”

श्रीमाताजी : तेथील रहिवासी त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार आणि त्यांच्याकडील साधनांनुसार, तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील. तो सहभाग यंत्रवत् नसावा तर जिवंत आणि खराखुरा असावयास हवा. तो प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असेल : म्हणजे, ज्यांच्याकडे भौतिक साधने आहेत, उदा. ज्याच्याकडे कारखान्यात निर्माण होणारे उत्पादन असेल तो त्यातील काही हिस्सा उत्पादनाच्या प्रमाणात पुरवेल. दर माणशी, दरडोई असे येथे काही नसेल…..

संवादक : “सहभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतो”… म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की जे ज्ञानी आहेत, जे आंतरिकरित्या काम करतात…

श्रीमाताजी : हो, तसेच आहे. ज्यांना उच्चतर असे आंतरिक ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांनी प्रत्यक्ष हातांनीच काम करायला हवे असे नाही, असे मला म्हणावयाचे आहे.

संवादक : “तेथे कोणतेही कर नसतील, पण प्रत्येकाने सामूहिक हितासाठी कर्मरूपाने, वस्तुरूपाने किंवा द्रव्यरूपाने योगदान द्यावयास हवे.”

श्रीमाताजी : हो हे अगदी स्पष्ट आहे : तेथे कर नसतील. पण प्रत्येकाने सामूहिक हितासाठी त्याच्या त्याच्या कर्माद्वारे, किंवा द्रव्य वा वस्तुरुपाने योगदान देणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे केवळ पैसाच आहे, अन्य काही नाही; ते पैसाच देतील. पण खरे सांगावयाचे तर, येथे ‘कर्म’ म्हणजे आंतरिक कर्म अपेक्षित आहे. – पण तसे उघडपणे म्हणता येत नाही, कारण लोक पुरेसे प्रामाणिक नसतात. कर्म हे पूर्णपणे आंतरिक, गूढ स्वरूपाचे असू शकते, पण त्यासाठी ते पूर्णपणे प्रामाणिक आणि सचोटीचे असावयास हवे, तसे करण्याची क्षमता हवी, ढोंग नको.

खरेतर, भौतिकदृष्ट्या प्रत्येक मानवाचा अधिकार आहे… पण तो ‘हक्क’ नाही… व्यवस्थाच अशी असली पाहिजे की, ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या भौतिक गरजांच्या पूर्तीची काळजी घेतली जाईल; ती पूर्तता हक्क आणि समतेच्या संकल्पनेनुसार नसेल, तर कमीतकमी गरजांवर आधारित असेल. आणि एकदा का अशा व्यवस्थेची घडी बसली की, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या – आर्थिक साधनांनुसार नव्हे – तर आंतरिक क्षमतांनुसार त्याचे त्याचे जीवन घडविण्याचे स्वातंत्र्य असेल.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 265-66)

तुम्ही बिनीचे शिलेदार आहात, तुम्हाला देण्यात आलेले कार्य सर्वाधिक कठीण आहे, पण मला वाटते हे कार्य सर्वात जास्त रोचक, आव्हानात्मक आहे. कारण ठोस, भरीव, टिकावू, विकसित होत जाणाऱ्या मार्गाच्या साहाय्याने, एक सच्चा ऑरोविलवासी बनण्यासाठी आवश्यक असणारी वृत्ती तुमची तुम्हालाच प्रस्थापित करावयाची आहे. खराखुरा ऑरोविलवासी होण्यासाठी आवश्यक असा एक धडा रोजच्या रोज शिकणे, दररोज त्या त्या दिवशीचा पाठ शिकणे… रोजचा सूर्योदय म्हणजे शोधकार्याची रोज एक नवी संधी. या मनोभूमिकेतून तुम्ही शोध घ्या.

शरीराला हालचालीची गरज असते. तुम्ही त्यास निष्क्रिय ठेवले तर ते आजारी पडून, वा कोणत्या ना कोणत्या रीतीने बंडखोरी सुरू करेल. खरेच, फुलझाडे लावणे, घर बांधणे, खरोखरच काहीतरी अंगमेहनतीचे काम शरीराला हवे असते. तुम्हाला ते जाणवले पाहिजे. काही लोक व्यायाम करतात, काही सायकल चालवतात, असे अगणित प्रकार असतात, परंतु तुमच्या या छोट्याशा समूहात तुम्ही सर्वांनी मिळून सहमतीने अशा काही गोष्टी ठरवाव्या की, जेणेकरून प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मानसिकतेला साजेसे, त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या गरजेनुसार मिळतेजुळते असे काही काम करावयास मिळेल. परंतु हे कल्पनेने ठरवावयाचे नाही. कल्पना फारशा चांगल्या नसतात, त्या कल्पनांमधून तुमच्यामध्ये पूर्वग्रह निर्माण होतात. उदाहरणार्थ,”ते काम चांगले आहे, हे काम माझ्या योग्यतेचे नाही,’’ अशासारखे निरर्थक विचार.

कोणतेही काम वाईट नसते – वाईट असतात ते कर्मचारी. जेव्हा तुम्ही एखादे काम योग्य पद्धतीने कसे करायचे हे जाणता तेव्हा, सर्वच कामे चांगली असतात. अगदी प्रत्येक काम चांगले असते. आणि हे एकप्रकारचे सामुदायिक संघटन आहे. आतील प्रकाशाविषयी जाणीवसंपन्न असण्याएवढे जर तुम्ही भाग्यवान असाल, तर तुम्हाला असे दिसेल की, तुम्ही केलेल्या कष्टातून जणूकाही तुम्ही भगवंताला आवाहन केले आहे; तेव्हा मग असे सामूहिक ऐक्य अत्यंत ठोस, घनीभूत होते. अवघ्या विश्वाचा शोध घ्यावयाचा आहे, हे सारेच विस्मयकारक आहे.

तुम्ही तरुण आहात, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि खरोखरी तरुण राहण्यासाठी, आपण सदोदित वर्धमान होत राहिले पाहिजे, विकसित होत राहिले पाहिजे, प्रगती करीत राहायला हवे. विकास हे तारुण्याचे लक्षण आहे आणि जाणिवेच्या विकासाला सीमाच नसते. मला वीस वर्षाचे म्हातारे आणि पन्नास, साठ, सत्तर वयाचे तरुण माहीत आहेत. आणि जेव्हा व्यक्ती कार्यरत राहते तेव्हा तिचे आरोग्य उत्तम राहते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 312-13)

व्यवहारात वागत असताना, तुमच्या उद्दिष्टाची तुम्हाला सुस्पष्ट कल्पना हवी. तुम्ही कुठे जात आहात, तुमचे गंतव्य काय आहे ह्याचे स्पष्ट ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून धनाचे उदाहरण घ्या. काळाच्या दृष्टीने पाहता, कित्येक शतके पुढचा असा एक आदर्श पाहा : धन ही अशी एक शक्ती असावी की, जिच्यावर कोणाचीच मालकी नसावी व ती त्या काळी उपलब्ध असणाऱ्या सर्वाधिक व्यापक वैश्विक प्रज्ञेने नियंत्रित केली जावी. अशा एखाद्या व्यक्तीची कल्पना करा की, जी समग्र पृथ्वीच्या गरजा जाणून घेण्याएवढी व्यापक दृष्टीची असेल व धनाचा विनियोग कोठे केला जावा हे सांगण्यासाठी लागणारी अचूकता बाळगणारी असेल, कळतेय तुम्हाला? आपण या ध्येयापासून कितीतरी दूर आहोत, नाही का? सध्याच्या घटकेला कोणी एखादा असे म्हणतो की, “हे माझे आहे,” अन् जेव्हा तो उदार बनतो तेव्हा तो म्हणतो की, ”हे मी तुला देतो.” खरेतर असे काही नसते.

परंतु आपण आज जे काही आहोत आणि आपण जे असलो पाहिजे यांच्यातील तफावत फार मोठी आहे. आणि त्याकरिता आपण लवचीक असायला हवे, आपले उद्दिष्ट कधीही नजरेआड होता कामा नये. त्यासाठी आपला मार्ग आपण स्वत:च शोधणे आवश्यक आहे आणि एका जन्मातच हे उद्दिष्ट साध्य होईल असे नाही, हे ही आपण ओळखून असले पाहिजे. हं, ते नक्कीच खूप कठीण आहे. आंतरिक शोध घेण्यापेक्षा देखील हे अधिक कठीण आहे. खरे सांगावयाचे झाले तर, हे शोधकार्य येथे ऑरोविलमध्ये येण्यापूर्वीच झालेले असावे.

त्यासाठी एक आरंभबिंदू आहे : जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतर्यामी अविचल प्रकाश दिसलेला असतो, तुम्हाला खात्रीपूर्वकतेने मार्गदर्शन करणारे एक अस्तित्व गवसलेले असते, तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होते की, सातत्याने, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत शिकण्यासारखे काहीतरी असते आणि असेही जाणवते की, जडभौतिकाच्या विद्यमान स्थितीमध्ये प्रगतीला नेहमीच वाव असतो. दर क्षणाला काय प्रगती करायची ते शोधण्याच्या उत्सुकतेने व्यक्तीने येथे यावे, जे जीवन विकसित होऊन, स्वत:ला परिपूर्ण बनवण्याची आस बाळगते, असे जीवन प्राप्त करून घ्यावे. म्हणजेच ”असे जीवन जे वृद्धिंगत होऊन स्वत:ला परिपूर्ण बनविण्याची आस बाळगते” हे ऑरोविलचे सामूहिक उद्दिष्ट असावे. आणि त्याउपर प्रत्येक व्यक्ती एकाच पद्धतीने ते साध्य करेल असे नव्हे – तर प्रत्येकाचा स्वत:चा असा एक मार्ग असेल.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 311-312)

ज्यांना कोणाला ऑरोविलमध्ये राहावयाचे आहे आणि कार्य करावयाचे आहे त्यांच्याकडे – पूर्ण शुभसंकल्प असणे आणि सत्य जाणून घेण्याची व त्याला शरणागत होण्याची सातत्यपूर्ण अभीप्सा असणे आवश्यक आहे. कार्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी लागणारी पुरेशी लवचीकता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे, तसेच परमसत्याच्या दिशेने वाटचाल होत राहावी यासाठी लागणारी प्रगतीची असीम अशी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.

एक मोलाचा सल्ला : दुसऱ्यांच्या दोषांकडे लक्ष देण्यापेक्षा, स्वत:च्या दोषांकडे लक्ष द्या. प्रत्येकजण जर स्वत:च्या आत्म-पूर्णत्वासाठी गांभीर्याने प्रयत्न करेल तर, त्यामागोमाग समष्टीचे पूर्णत्व आपोआपच येईल.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 200)

श्रीमाताजी : ऑरोविलवासीयांनी अन्नासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण त्यांनी त्याबदल्यात काही काम केले पाहिजे किंवा ते ज्याचे उत्पादन करतात ते त्यांनी देऊ केले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील पीक दिले पाहिजे; ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील उत्पादने दिली पाहिजेत; कोणी अन्नाच्या मोबदल्यात श्रमदान केले पाहिजे.

आणि त्यातूनच बऱ्याच अंशी पैशाची अंतर्गत देवाणघेवाण संपुष्टात येईल. प्रत्येक बाबतीतच आपण अशा गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. मूलत: ही अशा जीवनप्रणालीच्या अभ्यासाची व संशोधनाची नगरी असेल की, जी जीवनप्रणाली अधिक साधीसोपी असेल आणि जिच्यामध्ये उच्चतर गुणांचा विकास करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध असेल.

ही फक्त एक छोटी सुरुवात आहे….

मला या गोष्टीवर भर द्यावयाचा आहे की, ऑरोविल हा एक प्रयोग असेल. ऑरोविल हे प्रयोग करण्यासाठी; प्रयोग, संशोधन व अभ्यास यांसाठीच आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 263-64)

१. आपल्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, वंशीय आणि आनुवंशिक बाह्यरूपाच्या पाठीमागील आपले खरे अस्तित्व काय हे जाणून घेण्यासाठी आंतरिक शोध घेणे ही पहिली आवश्यकता आहे.

केंद्रस्थानी मुक्त, विशाल आणि जाणते असे अस्तित्व विद्यमान असते व आपण त्याचा शोध घ्यावा याची ते वाट बघत असते. ते आपल्या जीवाचे, अस्तित्वाचे व ऑरोविलमधील आपल्या जीवनाचे सक्रिय केंद्र बनले पाहिजे.

२. व्यक्ती नैतिक आणि सामाजिक प्रथा-परंपरांपासून, मुक्त होण्यासाठी ऑरोविलमध्ये राहते, परंतु हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वासना आणि महत्त्वाकांक्षेची, अहंकाराची एक नव्या प्रकारची गुलामी बनता कामा नये. व्यक्तीच्या वासनांची तृप्ती आंतरिक संशोधनाच्या मार्गाला अवरूद्ध करते, हा आंतरशोध केवळ शांतीत आणि सुयोग्य, निरपेक्ष अशा पारदर्शीतेतच साध्य करता येतो.

३. ऑरोविलवासीयाने व्यक्तिगत मालकीची भावना पुसून टाकली पाहिजे. कारण जीवाच्या प्रवासामध्ये लौकिक जगत हा एक टप्पा आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे त्याचे असे एक स्थान असते. त्या त्या स्थानानुसार व्यक्तीला त्याच्या जीवनासाठी व त्याच्या कार्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, ते येथे पुरविण्यात आलेले आहे. आपण जेवढे अधिक सजगतेने आपल्या अंतरात्म्याच्या संपर्कात येतो, तेवढ्याच प्रमाणात अधिक अचूक साधने आपल्याला पुरविण्यात येतात.

४. काम, मग ते अगदी अंगमेहनतीचे का असेना, आंतरिक शोधकार्यासाठी ते अनिवार्य असते. जर व्यक्ती काम करीत नसेल, जर स्वत:ची चेतना जडामध्ये स्थापित करीत नसेल तर, ते जड द्रव्य कधीच विकसित होणार नाही. एखाद्याच्या देहरूपी माध्यमाद्वारे चैतन्यशक्तीला जडाचा तीळमात्र भाग जरी सुसंघटित करू दिला गेला, तरी ते अधिक चांगले ठरेल. व्यक्तीने स्वत:च्या भोवती जर व्यवस्थितपणा सुस्थापित केला तर, त्यामुळे त्याच्या अंतरंगामध्येही एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण होण्यास हातभार लागतो.

व्यक्तीने स्वत:च्या जीवनाची आखणी बाह्यवर्ती, कृत्रिम नियमांच्या आधारे न करता, सुसंघटित झालेल्या आंतरिक चेतनेनुसार करावी. कारण, जर व्यक्ती स्वत:च्या जीवनाला उच्चतर चेतनेच्या नियंत्रणाखाली न ठेवता, बेलगामपणे पुढे जाऊ देत असेल तर, ते चंचल, अस्थिर होते आणि आविष्कारासाठी अक्षम बनते. जडद्रव्याचा जाणीवपूर्वक वापर न झाल्याने, जडद्रव्य तसेच शिल्लक राहते; म्हणजे एका अर्थाने, व्यक्तीने स्वत:चा वेळ व्यर्थ वाया घालविण्यासारखे होते.

५. अखिल पृथ्वीने नवीन प्रजातीच्या आगमनासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे आणि हे आगमन त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविल जाणीवपूर्णक कार्य करू इच्छिते.

६. ही नवी प्रजाती कशी असली पाहिजे हे एकेक करून आपल्यापुढे उघड होत जाईल आणि त्या दरम्यानच्या काळात स्वत:ला संपूर्णतया परमेश्वराधीन करणे हाच सर्वोत्तम मार्ग होय.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207-208)

श्रीमाताजी : सच्चा ऑरोविलवासी होण्यासाठी व्यक्तीने कसे असले पाहिजे ? असाच प्रश्न विचारला आहेस ना तू ? (‘अ’ला उद्देशून) त्याविषयी तुझ्या काही कल्पना आहेत का?

अ : खऱ्या अर्थाने ऑरोविलवासी (Aurovilian) होण्यासाठी माझ्या कल्पनेप्रमाणे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे – भगवंताला पूर्णपणे आत्मार्पण करण्याचा दृढसंकल्प असणे.

श्रीमाताजी : छान, चांगलेच आहे; पण असे लोक फार थोडे असतात. मी हे पहिल्या क्रमांकावर लिहिणार आहे… आता आपण क्रमांक दोनचा विचार करू.

वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून पाहता, अगदी नित्याच्या व्यवहारातील गोष्टी, उदाहरणार्थ : आपल्याला सर्व नैतिक आणि सामाजिक रूढी, संकेतांपासून मुक्त व्हायचे आहे. पण अगदी ह्याच बाबतीत आपल्याला अत्यंत सावधगिरीने राहिले पाहिजे ! व्यक्तीने जणू परवानाच मिळाल्याच्या थाटात, वासनांधपणे भोग घेत, त्यांच्या गर्ततेत जात, नैतिक-सामाजिक बंधनांतून मुक्तता मिळविता कामा नये; तर मुक्तता मिळवावयास हवी ती या रूढीपरंपरांच्या अतीत होऊन ! वासनांचे निर्मूलन करून, उच्चाटन करून, आणि नीतिनियमांच्या जागी परमेश्वराच्या आज्ञेची प्रस्थापना करून !

…आपल्याला देह देण्यात आलेला आहे तो त्यास नाकारण्यासाठी नव्हे तर त्याचे अधिक चांगल्या गोष्टीत रूपांतर करण्यासाठी. आणि निश्चितपणे ऑरोविलच्या ध्येयांपैकी हे एक ध्येय आहे. मानवी देहात सुधारणा केलीच पाहिजे, तो निर्दोष व परिपूर्ण बनविलाच पाहिजे जेणेकरून तो माणसापेक्षाही उच्चतर जीवयोनीच्या अभिव्यक्तीसाठी सक्षम असणारा असा अतिमानवी देह बनेल. आणि आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर ते तसे घडणार नाही हे निश्चित ! ज्ञानसंपन्न शारीरिक संस्कृतीच्या पायावर, शारीरिक क्रियाप्रक्रियांचा उपयोग करून घेत, योग, आसनांद्वारे, व्यायामाद्वारे, देहाला सक्षम बनवले पाहिजे. लहानशा व्यक्तिगत अशा गरजा व त्यांच्या पूर्ततेसाठी नव्हे तर, उच्चतर सौंदर्य व चेतना अभिव्यक्त करण्यासाठी देह सक्षम बनविणे आवश्यक आहे. आणि यासाठी शारीरिक शिक्षणाला त्याचे महत्त्वाचे असे योग्य ते स्थान दिले पाहिजे…..

आणि अशा प्रकारची शरीराची जोपासना व त्यावरील संस्कार हे जाणीवपूर्वक, जागरूकपणे केले पाहिजेत. काहीतरी अतिरेकी टोकाच्या किंवा अदभुत् गोष्टी करण्यासाठी नव्हे तर, उच्चतर चेतनेच्या अभिव्यक्तीसाठी देह सशक्त आणि लवचीक बनण्याची क्षमता त्या देहात यावी म्हणून ही शरीरोपासना केली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की : “ऑरोविलवासी हा स्वत:च्या इच्छावासनांचा गुलाम बनू इच्छित नाही.” हा महत्त्वाचा ठराव आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 335)