तुम्ही बिनीचे शिलेदार आहात, तुम्हाला देण्यात आलेले कार्य सर्वाधिक कठीण आहे, पण मला वाटते हे कार्य सर्वात जास्त रोचक, आव्हानात्मक आहे. कारण ठोस, भरीव, टिकावू, विकसित होत जाणाऱ्या मार्गाच्या साहाय्याने, एक सच्चा ऑरोविलवासी बनण्यासाठी आवश्यक असणारी वृत्ती तुमची तुम्हालाच प्रस्थापित करावयाची आहे. खराखुरा ऑरोविलवासी होण्यासाठी आवश्यक असा एक धडा रोजच्या रोज शिकणे, दररोज त्या त्या दिवशीचा पाठ शिकणे… रोजचा सूर्योदय म्हणजे शोधकार्याची रोज एक नवी संधी. या मनोभूमिकेतून तुम्ही शोध घ्या.

शरीराला हालचालीची गरज असते. तुम्ही त्यास निष्क्रिय ठेवले तर ते आजारी पडून, वा कोणत्या ना कोणत्या रीतीने बंडखोरी सुरू करेल. खरेच, फुलझाडे लावणे, घर बांधणे, खरोखरच काहीतरी अंगमेहनतीचे काम शरीराला हवे असते. तुम्हाला ते जाणवले पाहिजे. काही लोक व्यायाम करतात, काही सायकल चालवतात, असे अगणित प्रकार असतात, परंतु तुमच्या या छोट्याशा समूहात तुम्ही सर्वांनी मिळून सहमतीने अशा काही गोष्टी ठरवाव्या की, जेणेकरून प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मानसिकतेला साजेसे, त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या गरजेनुसार मिळतेजुळते असे काही काम करावयास मिळेल. परंतु हे कल्पनेने ठरवावयाचे नाही. कल्पना फारशा चांगल्या नसतात, त्या कल्पनांमधून तुमच्यामध्ये पूर्वग्रह निर्माण होतात. उदाहरणार्थ,”ते काम चांगले आहे, हे काम माझ्या योग्यतेचे नाही,’’ अशासारखे निरर्थक विचार.

कोणतेही काम वाईट नसते – वाईट असतात ते कर्मचारी. जेव्हा तुम्ही एखादे काम योग्य पद्धतीने कसे करायचे हे जाणता तेव्हा, सर्वच कामे चांगली असतात. अगदी प्रत्येक काम चांगले असते. आणि हे एकप्रकारचे सामुदायिक संघटन आहे. आतील प्रकाशाविषयी जाणीवसंपन्न असण्याएवढे जर तुम्ही भाग्यवान असाल, तर तुम्हाला असे दिसेल की, तुम्ही केलेल्या कष्टातून जणूकाही तुम्ही भगवंताला आवाहन केले आहे; तेव्हा मग असे सामूहिक ऐक्य अत्यंत ठोस, घनीभूत होते. अवघ्या विश्वाचा शोध घ्यावयाचा आहे, हे सारेच विस्मयकारक आहे.

तुम्ही तरुण आहात, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि खरोखरी तरुण राहण्यासाठी, आपण सदोदित वर्धमान होत राहिले पाहिजे, विकसित होत राहिले पाहिजे, प्रगती करीत राहायला हवे. विकास हे तारुण्याचे लक्षण आहे आणि जाणिवेच्या विकासाला सीमाच नसते. मला वीस वर्षाचे म्हातारे आणि पन्नास, साठ, सत्तर वयाचे तरुण माहीत आहेत. आणि जेव्हा व्यक्ती कार्यरत राहते तेव्हा तिचे आरोग्य उत्तम राहते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 312-13)

श्रीमाताजी