या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ती केवळ एकाचीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील.
शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा ह्या केवळ आणि केवळ दु:खभोग व चिंता यांच्या मूळकारणांवर विजय मिळविण्यासाठीच उपयोगात आणल्या जातील, त्या प्रेरणा व्यक्तीची दुर्बलता आणि अज्ञान यांच्यावर मात करण्यासाठी उपयोगात आणल्या जातील, त्यांच्या मर्यादा व अक्षमता यांना उल्लंघून जाण्यासाठी उपयोगात आणल्या जातील.
हे असे स्थान असेल की, जेथे इच्छावासनांच्या परिपूर्तीपेक्षा, तसेच सुखसुविधा, मौजमजा यांच्या मागे धावण्यापेक्षा, प्रगतीची तळमळ व आत्म्याची गरज या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाईल.
या ठिकाणी, स्वत:च्या आंतरात्म्याशी फारकत न होता, लहान मुलं समग्रपणे, सर्वांगीण रीतीने मोठी होतील, विकसित होतील; शिक्षण हे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, पद वा पदवी मिळविणे यांच्यासाठी दिले जाणार नाही तर, विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असलेल्या क्षमतांच्या विकसनासाठी तसेच सुप्त असलेल्या नवीन क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी दिले जाईल.
या ठिकाणी, पद, नावलौकिक, प्रतिष्ठा यांची जागा सेवा करण्याची, सुव्यवस्था लावण्याची संधी घेईल. एखादी व्यक्ती बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ असेल तर, त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्या संरचनेमध्ये जीवनातील वाढती सुखसमृद्धी व सत्ता यांच्याद्वारे अभिव्यक्त होणार नाही तर, त्या व्यक्तीवरील वाढत्या कर्तव्यांच्या व जबाबदाऱ्यांच्या रूपात ते श्रेष्ठत्व अभिव्यक्त होईल.
कलेच्या विविध रूपांमधून – चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य यांद्वारे – व्यक्त होणारे सौंदर्य सर्वांना सारख्याच प्रमाणात सुलभप्राप्य असेल; त्यामधून मिळणाऱ्या आनंदाचा आस्वाद घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीच्या सामाजिक वा आर्थिक स्थानावर अवलंबून असणार नाही तर, त्या त्या व्यक्तीच्या क्षमतांवर आधारित असेल.
कारण या आदर्श अशा ठिकाणी, पैसा हा सर्वसत्ताधीश या स्वरूपात अस्तित्वात उरणार नाही; भौतिक संपत्ती आणि सामाजिक स्थान यांपेक्षा व्यक्तीच्या गुणवत्तेला कितीतरी अधिक महत्त्व असेल.
तिथे, कर्म हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन नसेल तर, स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा तो मार्ग असेल, सर्व समष्टीसाठी सेवारत असताना, कर्म हा स्वतःच्या क्षमता व शक्यतांना विकसित करण्याचा मार्ग असेल, परिणामत: ते व्यक्तीला उपजीविकादेखील पुरवेल आणि कार्यक्षेत्रही पुरवेल.
थोडक्यात म्हणजे, हे असे एक स्थान असेल की जेथे, सर्वसाधारणत: जे मानवी नातेसंबंध स्पर्धासंघर्षांवर आधारित असतात त्यांची जागा खराखुरा बंधुभाव, सहकार्य, काही चांगले करण्याची, त्याचे अनुसरण करण्याची तळमळ ह्या गोष्टींनी घेतली जाईल.
हा आदर्श प्रत्यक्षात, वास्तवात उतरविण्यासाठी अजून तरी पृथ्वीची खचितच तयारी झालेली नाही, हे स्वप्न समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे ज्ञान अजूनपर्यंत मानवजातीकडे नाही, तसेच ह्या आदर्शाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी अगदी अनिवार्य असणारी चेतनाशक्तीदेखील मानवजातीकडे आज रोजी नाही, म्हणूनच मी ह्यास ‘स्वप्न’ असे म्हणते.
(श्रीमाताजींचे हे उद्गार होते ऑगस्ट १९५४ मधील. आणि पुढे अल्पावधीतच, म्हणजे इ.स.१९६८ मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने, त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 93-94)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024