ऑरोविल’ हे नक्की काय आहे ?

ऑरोविल ही जगभरातील विविध देशांमधून रहिवासासाठी आलेल्या ५०,००० व्यक्तींना सामावून घेऊ शकेल, अशी एक वैश्विक नगरी आहे.

ऑरोविलची सुरुवात कशी झाली?

मानवी एकतेच्या प्रयोगाला वाहिलेल्या एका आदर्श नगरीची म्हणजेच ऑरोविलची संकल्पना श्रीमाताजींच्या मनात इ. स. १९३० च्या सुमारास उदयास आली. इ. स. १९६० च्या मध्यामध्ये ही संकल्पना कागदावर उतरविण्यात आली आणि भारत सरकारपुढे मांडण्यात आली, भारताने या संकल्पनेस पाठिंबा दिला आणि युनेस्कोच्या जनरल असेंब्लीसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. आणि इ. स. १९६६ मध्ये युनेस्कोमध्ये त्याला एकमुखाने मान्यता देण्यात आली. मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, या प्रकल्पास पूर्ण प्रोत्साहन देण्यात आले.

ऑरोविल का?

विविधतेमध्ये मानवी एकता साकारणे हे ऑरोविलचे उद्दिष्ट आहे. ज्यामध्ये मानवी एकतेसाठी आणि जाणिवेच्या रूपांतरणासाठी कार्य केले जात आहे, असा ऑरोविल हा आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला पहिला आणि आजवरचा तरी एकमेव प्रयोग आहे. मानवजातीच्या शाश्वत जीवनासाठी आणि भावी सांस्कृतिक, पर्यावरणीय, सामाजिक आणि आध्यात्मिक आवश्यकतांवर येथे प्रत्यक्ष संशोधनाचे काम चालू असते.

ऑरोविलचा प्रारंभ केव्हा झाला?

ऑरोविल ह्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. १२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ‘ऑरोविलची सनद’ देखील ह्यासोबत ठेवण्यात आली. …ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.

ऑरोविल कोठे आहे ?

ऑरोविल हे दक्षिण भारतामध्ये, तामिळनाडू आणि पाँडिचेरी या राज्यांमध्ये वसलेले आहे. चेन्नईच्या दक्षिणेस १५० किमी अंतरावर आणि पाँडिचेरी शहराच्या उत्तरेस १० किमी अंतरावर ऑराविल वसलेले आहे.

ऑरोविलचे रहिवासी कोण आहेत?

ऑरोविलमध्ये ५९ देशांमधील, अगदी तान्ह्या बालकांपासून ते ८० वर्षे वयांपर्यंतच्या विविध वयोगटातील (सरासरी वय ३०), सर्व सामाजिक वर्गांमधील, विविध संस्कृती आणि पार्श्वभूमी असणारे, साऱ्या मानवतेचे प्रतिनिधित्व करणारे लोक राहतात. ऑरोविलमध्ये राहण्यास येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या येथे सुमारे २५०० व्यक्ती राहतात आणि त्यातील साधारणतः एक तृतीयांश व्यक्ती भारतीय आहेत.

शहररचना

शांती क्षेत्र
ऑरोविलचा मध्यवर्ती भाग हा ‘शांती क्षेत्र’ म्हणून ओळखला जातो, याच्या केंद्रस्थानी ‘मातृमंदिर’ आणि १२ बगिचे आहेत. याच्या शेजारी १२१ देशांची आणि भारतातील तत्कालीन २३ राज्यांमधील माती ज्यामध्ये साठविलेली आहे असा, मानवी एकतेचा कुंभ आहे. तो कुंभ अॅम्फिथिअटर येथे स्थापित करण्यात आलेला आहे. तसेच वातावरण शांत आणि पवित्र राहावे म्हणून चालविण्यात आलेला तलाव-प्रकल्पदेखील याच भागात आहे.

औद्योगिक क्षेत्र
शांतीक्षेत्राच्या उत्तरेस १०९ हेक्टरचे क्षेत्र हे ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून राखीव आहे, यामध्ये हरित उद्योगांचा समावेश होतो. ऑरोविल नगरीला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाण्याच्या प्रयत्नांवर या उद्योगांचे लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. या क्षेत्रामध्ये लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांचा, प्रशिक्षण केंद्रांचा, कलाकौशल्य, कारागिरी आणि शहराच्या प्रशासनाचा समावेश होतो.

निवासी क्षेत्र
शहराच्या चार क्षेत्रांपैकी हे सर्वात मोठे क्षेत्र असून ते १८९ हेक्टर एवढ्या भागात विस्तारलेले आहे. याच्या उत्तरेला, दक्षिणेला आणि पश्चिमेला बगिचे आहेत. वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनासाठी सुयोग्य असा अधिवास पुरविण्याकडे या क्षेत्राचा कल आहे. यातील ५५% क्षेत्र हरित असेल तर उरलेल्या ४५% भागामध्ये शहरी जीवन विस्तारलेले असेल.

आंतरराष्ट्रीय क्षेत्र
शांती क्षेत्राच्या पश्चिमेस ७४ हेक्टर क्षेत्रामध्ये ‘आंतरराष्ट्रीय क्षेत्र’ विस्तारले आहे. येथे खंडांनुसार, वेगवेगळे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मंडप असतील. प्रत्येक देशाचे आजवर मानवजातीला जे योगदान राहिलेले आहे त्याचे आणि त्यांच्या प्रतिभेचे आविष्करण करणे आणि त्या माध्यमातून विविधतेतील मानवी एकतेचे जिवंत प्रत्यक्षदर्शन घडविणे ही याची केंद्रवर्ती कल्पना आहे.

सांस्कृतिक क्षेत्र
शांतीक्षेत्राच्या पूर्वला ९३ हेक्टर परिसरामध्ये ‘सांस्कृतिक क्षेत्र’ आहे. शैक्षणिक आणि कलाविष्काराच्या उपयोजित संशोधनासाठी वाहिलेले हे क्षेत्र असणार आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा विषयक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा या क्षेत्रामध्ये उपलब्ध असतील.

हरित क्षेत्र
१.२५ किमी त्रिज्या असणाऱ्या शहराच्या सभोवती १.२५ किमी रुंदीचे हरित क्षेत्र असेल. सेंद्रीय शेती, दुग्धोत्पादन, जंगले, आणि वन्यजीवनाचा हा पट्टा असेल. शहरी अतिक्रमणाला रोखणारा असा हा भाग, जिथे वन्य-विविधता आढळून येईल. अन्नधान्य, लाकूडफाटा, औषधी वनस्पती यांचे उमगस्थान असेलेले असे हे ठिकाण असेल. मनोरंजनाचे देखील हे क्षेत्र असेल.
४०५ हेक्टरच्या हरित पट्याचे हे क्षेत्र आज घडणीच्या स्थितीत असले तरीही, ते पडिक जमिनीचे जिवंत इकोसिस्टिम मध्ये रूपांतरण घडवून आणण्याचे एक यशस्वी उदाहरण म्हणून मानले जाते. आणखी ८०० हेक्टर क्षेत्रामध्ये याच्या विस्ताराचे नियोजन आहे. ते मृदा व जल संरक्षण, जलपुनर्भरण, आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेचे एक जितेजागते उदाहरण बनू पाहत आहे. आणि हे क्षेत्र म्हणजे जणू संपूर्ण नगरीची फुफ्फुसे असल्याने, ते पूर्णत्वाला गेले की, ऑरोविलच्या निर्मितीबरोबर काही दशकांपूर्वी सुरु झालेली उपचारप्रक्रिया पूर्णत्वाला जाईल, अशी कल्पना आहे.