पुनर्जन्म या विषयाबद्दलची नेहमी होणारी एक सर्वसाधारण घोडचूक तुम्ही टाळली पाहिजे. कोणी एक ‘टायटस बाल्बस’ हा ‘जॉन स्मिथ’ म्हणून पुन्हा जन्म घेतो, म्हणजे तो माणूस मागील जन्मात होता अगदी त्याच व्यक्तिमत्त्वानिशी, त्याच चारित्र्याचा, तेच प्राप्तव्य लाभलेला असा जन्माला येतो; फरक इतकाच की आधी तो टोगा परिधान करावयाचा आणि आता तो कोटपँट वापरतो आणि लॅटिन भाषेऐवजी कॉकनी इंग्रजी भाषा बोलतो; अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. पण हे असे काही नसते.
काळाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत या भूतलावर तेच ते एकच व्यक्तिमत्त्व, तेच चारित्र्य पुन्हा पुन्हा धारण करण्यात फायदा काय? आत्मा हा अनुभव घेण्यासाठी, वाढीसाठी, उत्क्रांत होण्यासाठी जन्माला येतो; जडद्रव्यामध्ये ईश्वरत्व आणेपर्यंत हे विकसन चालू राहावयाचे असते. केंद्रात्मा पुन्हा जन्माला येत असतो; बाह्य व्यक्तिमत्त्वाचा पुनर्जन्म होत नाही…
व्यक्तिमत्त्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, त्या एका जन्मातील अनुभव घेण्यासाठी बनविण्यात आलेला निव्वळ एक साचा असतो. दुसऱ्या एका वेगळ्या जन्मामध्ये तो चैत्य पुरुष स्वत:साठी एक वेगळे व्यक्तिमत्त्व, वेगळ्या क्षमता, वेगळे जीवन आणि वेगळी कारकीर्द घडवेल. जर समजा, रोमन कवी व्हर्जिल हा परत जन्माला आला, तर तो एक किंवा दोन जन्मामध्ये परत काव्य हाताशी धरेलही, पण तो निश्चितपणे महाकाव्य लिहिणार नाही, तर त्याला ज्या पद्धतीच्या ललित, सुंदर रचना लिहावयाची इच्छा होती, पण रोममध्ये असताना तो त्या लिहू शकला नव्हता, तशा तो लिहील. पुढच्या एखाद्या जन्मामध्ये तो अजिबातच कवी नसेल, कदाचित तो सर्वोच्च सत्य अभिव्यक्त करू पाहणारा, आणि त्याच्या सिद्धीसाठी धडपडणारा तत्त्वज्ञानी, योगी असेल – कारण या गोष्टींकडेसुद्धा त्याच्या जाणिवेचा सुप्त कल होता. कदाचित आपल्या काव्यामधून त्याने ज्या एनियन वा ऑगस्टसचे वर्णन केले आहे त्यांच्यासारखा तो कोणी योद्धा वा सत्ताधीश आधीच्या जन्मात असू शकेल.
केंद्रात्मा या वा त्या अंगाने एक नवीन चारित्र्य, एक नवीन व्यक्तिमत्त्व वाढवतो, विकसित करतो आणि तो सर्व प्रकारच्या पार्थिव अनुभवांमधून जात राहतो. उत्क्रांत होणारा जीव जसजसा अधिकाधिक विकसित होत जातो, अधिकाधिक संपन्न आणि जटिल होत जातो, तसतसा आपली सर्व व्यक्तिमत्त्वं जणू तो साठवत जातो. कधीकधी ती व्यक्तिमत्त्वं त्याच्या सक्रिय घटकांच्या पाठीशी उभी असतात, त्याच्या दर्शनी व्यक्तिमत्त्वामध्ये, त्या व्यक्तिमत्त्वांचा काही रंग, काही गुणधर्म, काही क्षमता इथेतिथे अशा आढळून येतात – कधीकधी तर त्या अगदी पृष्ठवर्ती येतात आणि मग अशा व्यक्तीची विविधांगी व्यक्तिमत्त्वं आढळतात, ती व्यक्ती बहुआयामी असते, कधीकधी तर असे भासते की, त्या व्यक्तीच्या ठिकाणी वैश्विक क्षमता आहेत.
पण जर का आधीचेच व्यक्तिमत्त्व, आधीचीच क्षमता पूर्णत: पुढ्यात आणण्यात आली, तर आधी जे केले होते तेच करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा तशीच येणार नाही; तर नवीन आकारात, नवीन रूपात तीच क्षमता अभिव्यक्त होईल, पण असे करताना जे आधी अस्तित्वात होते, त्याचेच केवळ पुनरुत्पादन असे त्याचे स्वरूप असणार नाही; तर अस्तित्वाच्या एका नवीन सुमेळामध्ये त्यांचे सामावून जाणे असेल.
तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा बाळगता कामा नये की, आधीचा योद्धा, आधीचा कवी त्यांच्या बाह्य व्यक्तिवैशिष्ट्यांनिशी जसाच्या तसा पुन्हा येईल – हां, असे असू शकते की, त्याच्या बाह्य गुणवैशिष्ट्यांपैकी काही पुन्हा नवीन जन्मामध्येही दिसून येतील; पण ती गुणवैशिष्ट्ये एका नवीन गुणसम्मुचयामध्ये नव्याने प्रतिबिंबित झालेली असतील. पूर्वी जे केले नव्हते ते करण्यासाठी एका नव्या दिशेने सर्व शक्ती कामाला लावल्या जातील. आणखी एक गोष्ट अशी की, पुनर्जन्मामध्ये व्यक्तिमत्त्व, चारित्र्य ह्याला प्राधान्याने महत्त्व असत नाही. प्रकृतीच्या उत्क्रांतीच्या पाठीमागे चैत्य पुरुष असतो आणि तोच उत्क्रांत होत असतो.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 543-544)
- निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार - September 12, 2024
- साक्षात्कार आणि रूपांतरण - September 11, 2024
- अतिमानसिक साक्षात्कार - September 10, 2024