प्रश्न : मानसिक, प्राणिक आणि शारीरिक भीतीमध्ये काय फरक असतो?
श्रीमाताजी : जर तुम्ही तुमच्या मनाची स्पंदने, प्राणाच्या गतिविधी आणि शरीराच्या हालचाली यांविषयी सजग असाल, तर तुम्हाला तो फरक माहीत असतो. मनाच्या बाबतीत सांगावयाचे, तर ते अगदीच सोपे आहे. उदाहरणार्थ – विचार येतात; तुम्ही विचार करायला लागता की, सध्या हा असा असा आजार आहे, तो फारच संसर्गजन्य आहे, कदाचित त्याचा संसर्ग मला होण्याची शक्यता आहे आणि तसे जर का झालेच, तर ते फारच भयंकर असेल, मग हा आजार होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, उद्या काय होणार आहे कोण जाणे? इ. इ. …तेव्हा मन गडबडून जाते, भयभीत होते.
प्राणाच्या बाबतीत सांगावयाचे तर, तुम्हाला त्याची जाणीव होते. तुमच्या संवेदनांना त्याची जाणीव होते. तुम्हाला एकाएकी एकदम गरम वाटायला लागते, किंवा गार वाटायला लागते; तुम्हाला दरदरून घाम येतो किंवा अस्वस्थ वाटायला लागते. आणि मग तुम्हाला जाणवते की, हृदय खूप जोराने धडधडत आहे आणि अचानक तुम्हाला ताप भरतो, रक्ताभिसरण थांबल्यासारखे होते आणि तुम्ही गार पडता.
शारीरिक दृष्ट्या सांगावयाचे तर, जेव्हा तुमच्यामध्ये इतर दोन प्रकारच्या भीती नसतात, तेव्हा तुम्ही शारीरिक भीतीविषयी जागृत होऊ शकता. सर्वसाधारणतः इतर दोन अधिक जाणिवयुक्त असतात. मानसिक व प्राणिक भीती ह्या शारीरिक भीतीला तुमच्यापासून लपवून ठेवतात. मात्र जेव्हा तुमच्यामध्ये मानसिक किंवा प्राणिक भीती उरत नाही तेव्हा मग, तुम्हाला शारीरिक भीतीची जाणीव होऊ लागते. शरीरामधील भीती हे एक प्रकारचे चौकस, लहानसे असे स्पंदन असते, ते पेशींमध्ये शिरते आणि मग त्यांचा थरकाप उडू लागतो. पण हृदयाप्रमाणे त्या जोरजोराने धडधडत नाहीत. ती भीती त्या पेशींमध्येच असते आणि थोड्याशा कंपनाने सुद्धा त्यांचा थरकाप उडतो. आणि मग त्यावर नियंत्रण करणे अवघड असते. परंतु त्यावर नियंत्रण करता येणे शक्य असते.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 167)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024