तर अशी अशी कारणे असतात – असंख्य कारणे, अगणित कारणे असतात. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय असामान्य पद्धतीने एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि आजारपण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, तो बरा करावयाचा असेल तर, व्यक्तीला त्या आजाराचे कारण समजले पाहिजे, त्याचे रोगजंतु नव्हे. कारण असे घडते की, जेव्हा रोगजंतु असतात, तेव्हा डॉक्टर्स त्यांना मारण्यासाठी काहीतरी रामबाण उपाय शोधून काढतात, पण त्याने हा आजार बरा होतो आणि दुसराच कोणतातरी अधिक मोठा आजार उद्भवतो! कोणालाच समजत नाही की असे का? …पण कदाचित मला माहीत आहे.

कारण त्या आजाराचे कारण हे निव्वळ शारीरिक नसते, तर दुसरेच काही असते. जे पहिले लक्षण होते, ते कोणत्यातरी दुसऱ्याच अव्यवस्थेचे केवळ बाह्य लक्षण होते. आणि जोवर तुम्ही त्यात हात घालत नाही, ती अव्यवस्था शोधून काढत नाही, तोवर त्या येणाऱ्या आजाराला तुम्ही रोखू शकत नाही. ती अव्यवस्था शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे गहनगाढ असे गूढशास्त्राचे ज्ञान हवे आणि प्रत्येकाच्या आंतरिक कार्याविषयीचे सखोल ज्ञान हवे. तर आपण आत्ता इथे थोडक्यात, आंतरिक कारणांचा धावता आढावा घेतला.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी