कधीतरी असे सुद्धा होते, म्हणजे असे की, समग्र अस्तित्व प्रगती करत असते, चढत्या वाढत्या संतुलनासहित ते प्रगती करत असते आणि लक्षणीय प्रगती देखील करून घेते; तुम्हाला वाटू लागते की, तुम्ही खूपच अनुकूल स्थितीत आहात, सारे काही चांगले चालू आहे, तुम्हाला खात्री असते आणि तुम्ही तुमच्या मार्गावर समृद्धपणे वाटचाल करत आहात हे तुम्ही पाहत असता… आणि अचानक ! अचानक आजारपण येते. तुम्हाला असे वाटते : हे असे कसे काय ? मी इतक्या चांगल्या अवस्थेत होतो आणि आता मी आजारी पडलो. हे काही योग्य नाही.
परंतु तुम्ही पूर्णपणे सजग नसल्यामुळे ते घडलेले असते. तुमच्याच मध्ये असा एक छोटासा भाग होता, ज्याला हालचाल करायची इच्छाच नव्हती. बहुधा तुमच्या प्राणामध्ये असे काहीतरी असते, किंवा कधीकधी ती एक मानसिक रचना असते, तिला त्याचे अनुसरण करण्याची तयारी नसते; तर कधीतरी तुमच्या शरीरातीलच असे काही असते, की जे अगदी जड असते किंवा ज्याची वाटचाल करण्याची यत्किंचितही इच्छा नसते, गोष्टी जशा आहेत तशाच नेहमी असाव्यात असे त्याला वाटत असते. ती गोष्ट तुम्हाला मागे खेचत असते, हेतूपूर्वक स्वतःला ती विलग करत असते.
आणि साहजिकपणे, ती गोष्ट अगदी छोटीशी जरी असली तरी, ती जीवामध्ये एवढे असंतुलन निर्माण करते की, त्यामुळे तुम्ही आजारी पडता. आणि तुम्ही स्वतःशीच म्हणता की, “खरोखर किती दयनीय अवस्था आहे ही, माझे इतके चांगले चालू होते, पण जे चालू आहे ते मात्र काही बरोबर नाही. खरंच देव दयाळू नाहीये. …मी इतकी छान प्रगती करत होतो, आजारपणापासून त्याने मला वाचवायला हवे होते.” हे असे आहे…
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १४ - September 21, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १३ - September 20, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ११ - September 18, 2023