मी म्हटल्याप्रमाणे कारणे असंख्य असतात, आंतरिक कारणे तर असतातच, म्हणजे जी तुमची व्यक्तिगत असतात अशी कारणे असतातच आणि बाकीची बाह्यवर्ती कारणेही असतात, जी तुमच्यामध्ये बाहेरून येतात. म्हणजे आता दोन मुख्य प्रकार पडले.

आपण म्हणालो तसे, तुमच्यामध्ये मेंदू, फुफ्फुसे, हृदय, पोट, यकृत इ. इ. घटक असतात. जर प्रत्येक जण त्याचे त्याचे कर्तव्य आणि त्याचे कार्य सामान्य पद्धतीने करेल आणि दिलेल्या वेळी सर्व जण एकदिलाने एकत्रितपणे, योग्य प्रकारे चालतील; असे आपण गृहीत धरू की, ते परस्परांशी सुसंवादी आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांचे एकमेकांशी चांगले जुळते आणि जो तो आपापले काम करत आहे; अगदी प्रत्येक हालचाल योग्य वेळी, इतरांशी संवादी राहत, कोणी खूप लवकरही नाही किंवा उशीराही नाही, कोणी खूप वेगाने किंवा कोणी अगदीच सावकाश, असेही नाही, खरोखर, सारे काही सुरळीत चालू असेल तर, तुम्ही अगदी ठणठणीत असता. (हे लक्षात घ्या की, जर तुम्हाला त्या सगळ्याचा विचार करत बसावे लागले असते तर, ते किती गुंतागुंतीचे झाले असते आणि जर का ते तसे असते तर, ते सर्व काही नेहमीच योग्य प्रकारे झाले असते की नाही, याविषयी मला शंका आहे.)

आता असे समजा की, त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण, या ना त्या कारणाने, वाईट मनःस्थितीत असेल – म्हणजे तो आवश्यक तेवढ्या जोशाने काम करत नाही, एखाद्या नेमक्या क्षणीच तो संपावर जातो. तेव्हा तो एकटाच आजारी पडतो असे समजू नका, तर सगळी व्यवस्थाच कोलमडून पडते आणि मग तुम्हाला अगदीच आजारी असल्याचे वाटायला लागते.

आणि जर का दुर्दैवाने, प्राणिक असंतुलनही असेल, म्हणजे, जसे की तुम्ही निराश असाल किंवा एखादी भावना खूप आक्रमक असेल, किंवा एखादा आवेग खूप तीव्र असेल किंवा तुमच्या प्राणाला बिनसवणारे असे दुसरे काही असेल, तर त्याची त्यामध्ये भरच पडते. आणि त्यात भरीस भर म्हणून, तुमचे विचार सैरभैर झाले असतील आणि तुम्ही नको त्या कल्पना करू लागलात, आणि मनामध्ये भीतीदायक गोष्टी आणि भयानक संकटांची कल्पना करू लागलात, तर मग मात्र तुम्ही नक्कीच पूर्णपणे आजारी पडता…. गोष्टी किती गुंतागुंतीच्या असतात, हे लक्षात आले ? एखादी बारकीशी गोष्ट चुकीच्या पद्धतीने वागू लागली तर, आंतरिक संसर्गाने ती अधिक गंभीर गोष्टींकडे घेऊन जाणारी ठरते. म्हणून गोष्टी तत्काळ नियंत्रणात आणणे किती महत्त्वाचे असते, लक्षात आले ?
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी