अगदी केवळ शरीराच्या दृष्टिकोनातून पाहावयाचे झाले तर, दोन प्रकारची असंतुलने आढळून येतात – कार्यात्मक असंतुलन (functional disequilibrium) आणि इंद्रियगत असंतुलन (organic disequilibrium). तुम्हाला या दोन्हीतील फरक माहीत आहे की नाही, ते मला माहीत नाही. परंतु तुम्हाला अवयव असतात आणि तुमच्या शरीराचे सगळे भाग देखील असतात उदा. नसा, स्नायू, हाडे आणि अशा इतर सगळ्या गोष्टी.

इंद्रियगत असंतुलन

आता, जर का एकादा अवयव स्वतःच असंतुलित असेल तर, ते झाले इंद्रियगत असंतुलन. तेव्हा मग तुम्हाला सांगण्यात येते की, हा अवयव आजारी आहे किंवा मग त्याची घडण नीट झालेली नाही किंवा अमुक एक अवयव सामान्य स्थितीत नाही किंवा त्याच्या बाबतीत एखादा अपघात झालेला आहे इ. इ. म्हणजे येथे एखादा अवयव आजारी असतो.

कार्यात्मक असंतुलन

परंतु कधीकधी अवयव सुस्थितीत असू शकतो, तुमचे सगळे अवयव अगदी जागच्या जागी सुस्थितीत असू शकतात पण तरीही, ते नीट काम करत नसतात, म्हणूनही आजारपण येऊ शकते. तिथे कार्यपद्धतीमध्ये संतुलनाचा अभाव असतो. तुमचे पोट व्यवस्थित असते, पण अचानक असे काहीतरी होते आणि ते नीट कार्य करत नाही; किंवा तुमचे शरीर पण अगदी उत्तम असू शकेल, पण त्याला असे काहीतरी होते आणि मग ते योग्य प्रकारे काम करत नाही. तेव्हा हे जे आजारपण असते ते, इंद्रियगत असंतुलनामुळे नसून, कार्यात्मक असंतुलनामुळे घडून आलेले असते. साधारणपणे कार्यात्मक असंतुलनातून उद्भवलेले असे जे आजार असतात, ते इतरांपेक्षा अधिक लवकर आणि सहजपणे बरे होतात. इतर आजार मात्र काहीसे अधिक गंभीर बनतात. कधीकधी तर ते फारच जास्त गंभीर बनतात. तेव्हा आता निरीक्षणासाठी आणि जाणून घेण्यासाठी ही दोन क्षेत्रं आहेतच, परंतु जर तुम्हाला तुमच्या शरीराचे थोडेसे जरी ज्ञान असेल आणि त्याच्या कार्याचे निरीक्षण करण्याची तुम्हाला जर सवय असेल तर, तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारचे असंतुलन घडून आले आहे हे तुम्हाला समजू शकते.

जेव्हा तुम्ही लहान असता आणि सामान्य जीवन जगत असता, तेव्हा बऱ्याचदा हे असंतुलन निव्वळ कार्यात्मक असते. ज्यांच्याबाबतीत काही अपघात घडून आलेला आहे किंवा जन्मापूर्वीच काही असंतुलन घडले आहे, अशी काही कारणे असणारे थोडेच जण असतात. अशा लोकांमध्ये असे काही असते की, जे बरे होण्यासाठी अधिक कठीण असते (ते बरे होण्यासारखेच नसतात, असे मात्र नाही कारण सैद्धान्तिक दृष्ट्या, बरे न होण्यासारखे असे काहीच नाही.) परंतु ते बरे करणे अधिक कठीण असते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी