पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये श्रीमाताजी पाँँडिचेरी येथे राहात होत्या, तेव्हाची गोष्ट त्या कथन करत आहेत.. “मी तेव्हा ड्युप्लेक्स स्ट्रीटवर राहत असे आणि समोरच्या बाजूला गेस्ट हाऊसमध्ये श्रीअरविंदांची खोली होती. श्रीअरविंदांच्या खोलीकडे तोंड करून, सकाळच्या वेळी, मी ध्यानाला बसत असे. अशीच एकदा मी माझ्या खोलीत बसून ध्यान करत होते, पण माझे डोळे मिटलेले नव्हते.

माझ्या खोलीत काली प्रवेश करत असलेली मला दिसली, तेव्हा मी तिला विचारले, “तुला काय हवे आहे?”

ती अगदी रौद्ररूपात नृत्य करत होती. ती मला म्हणाली, “मी पॅरिस घेतले आहे; आणि आता लवकरच पॅरिसचा विनाश होईल.”

तेव्हा आमच्यापर्यंत युद्धाच्या बातम्या पोहोचत नसत. मी तेव्हा ध्यानातच, अगदी शांतपणे, पण खंबीरपणे तिला म्हटले, ”नाही, पॅरिस घेता येणार नाही, पॅरिस वाचेल.” तेव्हा तिने वेडीवाकडी तोंडं केली पण ती निघून गेली.

आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तार मिळाली; त्यात लिहिले होते, जर्मन सैन्य पॅरिसच्या दिशेने कूच करत होते, पण पॅरिसचे रक्षण करण्यास तेथे कोणीच नव्हते, काही किलोमीटर ते पुढे गेले असते तर, आख्खे पॅरिस त्यांना हस्तगत करता आले असते. परंतु रस्ते मोकळे आहेत हे पाहिल्यावर तसेच, सैन्याला विरोध करण्यासाठी कोणीच नाही हे लक्षात आल्यावर, त्यांची अशी खात्रीच पटली की, काहीतरी घातपात दिसतो आहे, काहीतरी व्यूहरचनेचा हा भाग दिसतोय…असे वाटून त्यांनी पाठ फिरवली आणि आल्या पावली जर्मन सैन्य चालू पडले. आणि जेव्हा फ्रेंच सैन्याच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्या सैन्याचा पाठलाग केला आणि मग निर्णायक लढाई झाली. त्यांना रोखण्यात आले होते.

हो, निश्चितच, हा त्याचाच परिणाम होता….कारण, जर त्यांना ह्याप्रकारे रोखले गेले नसते तर, भलतेच काहीतरी विपरित घडले असते..”

– श्रीमाताजी

(CWM 06 : 68-69)

अभीप्सा मराठी मासिक