श्रीमाताजी : अतिमानस चेतनेला मानवी चेतनेमध्ये प्रवेश करून, स्वत:चे आविष्करण करता येणे शक्य व्हावे, ह्यासाठी मानवी चेतनेची अपेक्षित अशी अवस्था, एक दिवस निश्चितपणे येईल. मानव वंश तयार होण्यासाठी जसा प्रचंड काळ लागला होता, त्याप्रमाणेच हा नवीन वंश तयार होण्यासाठीदेखील खूप काळ लागण्याची शक्यता आहे. आणि हे क्रमाक्रमानेच घडून येणार आहे. पण मी म्हटले होते त्याप्रमाणे, जेव्हा घडायचे असेल तेव्हा ते घडेलच… एक वेळ असते, जेव्हा हे घडून येते, जेव्हा ते अवतरण घडून येते, जेव्हा संयोजन घडून येते, जेव्हा हे तादात्म्य घडून येते. कदाचित हे निमिषार्धातही घडून येते. एक क्षण असतो, जेव्हा हे घडते. नंतर मात्र कदाचित खूप, खूप, खूप वेळ जावा लागतो. एका रात्रीमध्ये जिकडे तिकडे अतिमानव प्रकट झालेले एखाद्याला दिसू शकतील, अशी कल्पना कोणी करता कामा नये. आणि ते असे असणारही नाही. मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले आहे, ज्यांनी सर्वांसाठी सर्व प्रकारचा धोका पत्करला आहे, त्यांनाच हे कळू शकेल. केवळ त्यांनाच हे समजू शकेल; जेव्हा हे घडून येईल तेव्हा ते त्यांना ज्ञात होईल.

प्रश्न : म्हणजे, इतरांना ते दिसूही शकणार नाही?

श्रीमाताजी : इतरांना त्याची साधी जाणीवसुद्धा नसेल. काय घडले आहे ते जाणून न घेता, ते त्यांचे स्वत:चे मूढ जीवन तसेच चालू ठेवतील.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 328-329)

श्रीमाताजी