१९१६ ते १९१९ या काळात मीरा अल्फांसा (श्रीमाताजी) जपानमध्ये वास्तव्यास होत्या. त्या काळातील त्यांची जिवश्चकंठश्च मैत्रीण कोबायाशी यांनी श्रीमाताजींविषयी सांगितलेल्या आठवणी.

जपानी भाषा शिकण्यासाठी आणि आमच्यातील एक होऊन जाण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या; पण त्यांच्या मोहक आणि नावीन्यपूर्ण वागणुकीतून आम्हालाच कितीतरी शिकायला मिळाले. मोठी गोड मैत्रीण होती ती. फार हुशार, अत्यंत तल्लख, उत्तम कलावंत, तिच्या बोटांवर कला नाचत होती. माझे रंगीत चित्र तिने काढले होते; अजूनही ते मी माझ्याजवळ जपून ठेवले आहे. आम्ही दोघी मनोहर निसर्गदृश्य टिपण्यासाठी आणि अधिक नीलिम आकाश न्याहाळण्यासाठी उत्सुक असायचो. बुद्धाची जन्मभूमी असलेल्या प्राचीन देशातील एका गुरूंना (श्रीअरविंद) ती पूजनीय मानत होती. तिचा दृढ विश्वास होता की, उद्याच्या जगाला तेच सत्यमंत्र देणार आहेत. त्यांच्याबद्दल जेव्हा ती माझ्याशी बोलत असे तेव्हा तिच्या डोळ्यांत नवीन आनंद आणि आश्चर्य तरळत असलेले मला दिसे…

नारा येथील मंदिराच्या छपरावरून खाली लोंबत असलेली व्हिस्टेरिया वेलीची सुंदर फुले तिला फार आवडत असत. आम्ही त्या फुलांना ‘हुजी’ म्हणतो. ती त्या फुलांशी एकरूप होई. तिने स्वत:साठी एक जपानी नाव निवडले होते – हुजीको. आणि माझे नाव न्योबूको कोबायाशी.

(The Mother’s Light : 82)

अभीप्सा मराठी मासिक