इ. स. १९५५ च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींनी साधकांना जो संदेश दिला होता, त्याची पार्श्वभूमी खालील प्रश्नोत्तरामध्ये अभिव्यक्त झालेली आहे. कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःला जाणिवपूर्वकपणे आणि निरपवादपणे ईश्वराच्या बाजूस राखले पाहिजे; त्यामुळे सरतेशेवटी विजयाची सुनिश्चिती आहे, हे त्यांनी त्यामध्ये नमूद केले होते.

आज काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, संदर्भ बदललेला आहे तरीही श्रीमाताजींनी दिलेला संदेश तेवढाच सार्थ आहे, म्हणून येथे त्या संदेशाची पुन्हा एकदा आठवण…

*

प्रश्न : येणारे हे वर्ष आश्रम किंवा भारतासाठी आणि अखिल जगासाठी अवघड असेल का?

श्रीमाताजी : सामान्यतः जग, भारत, आश्रम आणि व्यक्तींसाठी सुद्धा हे वर्ष अवघड असेल. अर्थात ते ज्याच्या त्याच्या अवस्थेवर अवलंबून आहे, सर्वांसाठी ते सारखेच असेल असे मात्र नाही. काही गोष्टी या इतरांपेक्षा अधिक सोप्या भासतील. पण हो, सर्वसामान्यतः सांगायचे झाले तर हे वर्ष अवघड असेल – जर तुम्ही समजून घेऊ इच्छित असाल तर, मी तुम्हाला सांगू शकते की, सद्यकालीन साक्षात्काराच्या विरोधात विजय प्राप्त करून घेण्याची विरोधी शक्तींसाठीची ही शेवटची संधी असेल.

परंतु व्यक्तीने या काही महिन्यांच्या कालावधीत स्वतःला दृढ राखले तर, या विरोधी शक्ती फारसे काही बिघडवू शकणार नाहीत; त्यांचा विरोध ढासळून पडेल.

हा मूलतः विरोधी शक्तींचा, अदिव्य शक्तींचा संघर्ष आहे; ह्या शक्ती दिव्य साक्षात्काराला त्यांच्या परीने होता होईल तेवढे मागे रेटू पाहत आहेत.. त्या हजारो वर्षे या आशेवर आहेत. आणि आता तो संघर्ष टोकाला गेला आहे. ही त्यांची शेवटची संधी आहे; आणि या त्यांच्या बाह्य कृत्यामागे जे कोणी आहेत ते पूर्णतः जागृत जीव आहेत; त्यांना हे चांगलेच माहीत आहे की, ही त्यांची शेवटची संधी असणार आहे आणि म्हणूनच त्यांना जेवढे शक्य आहे तेवढे आटोकाट प्रयत्न ते करणार. आणि ते जे काही करू शकतात ते खूपच जास्त आहे. सामान्य किरकोळ मानवी जाणिवांसारखी त्यांची जाणीव नाही. त्यांची जाणीव अजिबातच मानवी नाही. मानवी जाणिवांच्या शक्यतेच्या तुलनेत पाहता, त्यांच्या जाणिवा ह्या, त्यांच्या शक्तीच्या, सामर्थ्याच्या आणि अगदी त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा दैवी आहेत असे भासते.

म्हणून हा एक भयानक संघर्ष असणार आहे आणि तो पूर्णतः पृथ्वीवर केंद्रित झालेला असणार आहे कारण, त्यांना हे माहीत आहे की, पहिला विजय मिळवायचा आहे तो या पृथ्वीवरच! एक निर्णायक विजय, असा विजय जो पृथ्वीच्या भवितव्याची दिशा ठरविणारा असेल.

जेव्हा गोष्टी भयावह बनतील तेव्हा, जे उदात्त हृदयाचे असून, आपला माथा उन्नत ठेऊ शकतील, ते कुशलमंगल राहू शकतील.

स्वतःचे उत्थान करून घेण्याची ही एक संधी असेल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 459-460)

“हे दुर्भाग्या, तुझे कल्याण होवो, कारण तुझ्या माध्यमातूनच मला माझ्या प्राणेश्वराचे मुखदर्शन झाले.” – असे श्रीअरविंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात,

जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला ईश्वराच्या मुखदर्शन झाले तर, त्याला दुर्भाग्य तरी कसे म्हणावे, नाही का ? अर्थातच, त्याला दुर्भाग्य म्हणताच येणार नाही, तो तर कृपाशीर्वाद ठरेल. आणि नेमकेपणाने हेच श्रीअरविंदांना येथे म्हणावयाचे आहे.

आपण ज्या अपेक्षा करतो, आपण ज्याची आशा बाळगतो, आपल्याला जे हवे असते, तसे जेव्हा घडत नाही; आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा काहीतरी विपरितच घडते तेव्हा, आपल्यातील अज्ञानामुळे आपण त्याला दुर्भाग्य म्हणतो आणि शोक करतो.

पण जर का आपण थोडेसे जरी समजदार झालो आणि त्याच घटनांचे खोलवर परिणाम काय झाले याचे अवलोकन केले तर, आपल्या असे ध्यानात येईल की, ह्याच घटना आपल्याला त्वरेने ईश्वराकडे, आपल्या प्राणेश्वराकडे घेऊन जात आहेत.

उलटपक्षी, सहज-सुखासीन परिस्थिती मात्र आपल्याला मार्गावर अळमटळम करण्यास प्रोत्साहित करते, ती परिस्थिती, या मार्गावर आपल्या समोर सौख्याची फुले पसरते आणि ती वेचून घेण्यासाठी आपण मार्गावर मध्येच थांबून राहतो. आपल्या प्रगतीमध्ये विलंब होऊ नये यासाठी, अशा गोष्टींचा निर्धारपूर्वक अस्वीकार करण्याइतपत आपण प्रामाणिकही नसतो किंवा खूपच दुर्बल असतो. यश किंवा छोट्याछोट्या सुखोपभांना सामोरे जायचे आणि तरीही मार्गावरून ढळायचे नाही, हे जमण्यासाठी व्यक्ती मूळातच दृढ असावी लागते किंवा ती मार्गावर पुष्कळ प्रगत झालेली असावी लागते.

असे जे कोणी करू शकतात, जे असे दृढनिश्चयी असतात, ते यशाच्या मागे धावत नाहीत, ते यश मिळविण्यासाठी आटापिटा करत नाही आणि जर यश प्राप्त झालेच तरी ते यश अगदी निःसंगपणे स्वीकारतात. कारण दुःख व दुर्भाग्यामुळे यांना जे तडाखे बसलेले असतात त्याचे मूल्य त्यांना माहीत असते आणि त्याची त्यांना कदरही असते.

आपल्याला यश व अपयश, आनंद व दुःख, सुदैव व दुर्दैव ह्या गोष्टी सारख्याच समाधानी स्थिरचित्तवृत्तीने स्वीकारण्यासाठी जी सक्षम बनवते, ती परिपूर्ण समता ही, आपण आपल्या ध्येयाच्या निकट पोहोचलो आहोत याची खूण, याची साक्ष असते. आणि खराखुरा योग्य दृष्टिकोनदेखील तोच असतो.

तात्पर्य असे की, ईश्वराने त्याच्या अपार करूणेतून, ज्या ज्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव केलेला असतो त्या साऱ्याच गोष्टी या आपल्यासाठी अद्भुत वरदान ठरतात.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 58-59)

चैत्य पुरुषाचे जागृत होणे आणि तो पुढे येणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चैत्य पुरुषाचे जागृत होणे म्हणजे मागे असलेल्या चैत्याची जाणीवपूर्वक कृती…

जेव्हा तो पुढे येतो तेव्हा तो मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अधिराज्य गाजवतो आणि त्यांच्या सर्व हालचालींचे चैत्यीकरण करतो. विशेषत: अभीप्सा बाळगून व कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, नि:शेषत्वाने श्रीमाताजींकडे पूर्णपणे वळल्याने आणि त्यांना समर्पित झाल्याने चैत्यपुरुष पुढे येतो. परंतु कधीकधी ‘आधार’ (मन, प्राण आणि शरीर) जर सक्षम झालेला असेल तर, अशावेळी तो स्वत:हूनच पुढे येतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 354-355)

जेव्हा चैत्य पुरुष पुढे येतो तेव्हा, व्यक्तीला, साध्यासुध्या उत्स्फूर्त अशा आत्मदानासहित चैत्य पुरुषाची जाणीव होते आणि मन, प्राण व शरीर यांच्यावरील त्याच्या चढत्या-वाढत्या थेट नियंत्रणाचा व्यक्तीला अनुभव येतो; हे नियंत्रण निव्वळ झाकलेल्या किंवा अर्ध-झाकलेल्या प्रभावातून आलेले नसते, तर ते थेट नियंत्रण असते.

विशेषत: जेव्हा चैत्य विवेक येतो तेव्हा विचार, भावनिक आंदोलनं, प्राणिक आवेग, शारीरिक सवयी एकाएकी उजळून निघतात आणि तेथे काहीच धूम्राच्छादित, झाकोळलेले, तिमिरात्मक असे शिल्लक रहात नाही; चुकीच्या हिंदोळ्यांऐवजी योग्य स्पंदने त्यांची जागा घेतात. हा चैत्य विवेक दुर्लभ आणि दुर्मिळ असतो.

*

केंद्रवर्ती प्रेम, भक्ती, समर्पण, सर्वस्वदान, आध्यात्मिक दृष्ट्या योग्य काय व अयोग्य काय हे नेहमीच स्वच्छपणे पाहणारी आणि आपोआपच अयोग्य गोष्टींना नकार देणारी आंतरिक दृष्टी ही चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.

तसेच, समग्र आत्मनिवेदनाची प्रक्रिया आणि एखाद्या व्यक्तीने स्वत:मधील सर्वाचे श्रीमाताजींच्या प्रति केलेले समर्पण ही देखील चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 352), (CWSA 30 : 356)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

एखाद्या व्यक्तीला चैत्य पुरुषाचा शोध घ्यावयाचा असेल, तर त्या व्यक्तीला चैत्य पुरुषाच्या अस्तित्वाविषयी दृढ विश्वास व श्रद्धा असणे, अपेक्षित आहे. व्यक्ती त्याविषयी जागरुक व्हावयास हवी आणि चैत्य पुरुषाने आपले जीवन हाती घेऊन, आपल्या कृतींना दिशादर्शन करणे हाती घ्यावे ह्यासाठी, व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. व्यक्तीने प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ घेऊन, त्याला आपले मार्गदर्शक बनविले पाहिजे. व्यक्ती चैत्य पुरुषाला अधिकाधिक आत्मनिवेदन करत गेली, त्याचे मार्गदर्शन अधिकाधिक घेत राहिली तर, व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वाच्या विविध गतिविधींविषयी जागरुक होते.

*

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे, त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 302) आणि (CWM 16 : 399)

जर का कोणी ईश्वरावर प्रेम करेल तर हळूहळू, या प्रेमाच्या प्रयत्नातून ती व्यक्ती अधिकाधिक ईश्वरसदृश होऊ लागते. आणि नंतर ती त्या दिव्य प्रेमाशीच एकरूप होते तेव्हा, तिला दिव्य प्रेम काय असते ह्याची जाण येते.
*
समग्र जीवन ईश्वराभिमुख झालेले, ईश्वराप्रत समर्पित झालेले, ईश्वराच्या सेवेमध्ये रममाण झालेले असणे म्हणजेच कणाकणाने, क्रमश: ईश्वराची अभिव्यक्ती होत जाणे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 106)

सत्यशोधन आणि त्याप्रत पोहोचणे या गोष्टी आपापल्या मार्गाने मुक्तपणे अनुसरता येणे, हा प्रत्येक मनुष्याचा अधिकारच आहे. परंतु प्रत्येकाला हे ठाऊक असावयास हवे की, त्याला लागलेला शोध हा केवळ त्याच्यासाठीच उचित आहे आणि तो त्याने इतरांवर लादता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207)

जोपर्यंत धर्म अस्तित्वात राहतील तोपर्यंत समतोल राखण्यासाठी नास्तिकतावाद अपरिहार्य आहे. नंतर मात्र धार्मिकता आणि नास्तिकता या दोहोंनी निवृत्त होऊन सत्याचा प्रामाणिक आणि निरपेक्षपणे शोध घेण्यासाठी आणि या शोधाच्या उद्दिष्टाला पूर्ण समर्पण करण्यासाठी जागा करून देणे आवश्यक आहे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 284)

श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, ”माताजी, तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन तुमचा चैत्य पुरुष करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?”

श्रीमाताजी म्हणाल्या, ”ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मिस्टर मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. मी जरी थिऑन ह्यांना ओळखत नव्हते तरीही, ते मात्र मला ओळखत होते, ह्याचे मला आश्चर्य वाटले. थिऑन हे गूढवादाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी मला त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले.

पुढे मग मी गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या गावी अल्जेरियामध्ये थ्लेमसेन येथे गेले. तेव्हा मी २७-२८ वर्षांची होते आणि आयुष्यात प्रथमच एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करत होते.

मी तेथे पोहोचले तेव्हा, मार्क थिऑन मला न्यायला आले होते. अॅटलास पर्वतराजींच्या उतरंडीवर त्यांचे घर होते. त्यांची मोठी इस्टेट होती. त्यामध्ये शेकडो वर्षांपूर्वीची ऑलिव्हची, अंजीरांची झाडे होती. त्या सगळ्या वृक्षराजींमधून आम्ही वर वर चाललो होतो. त्यांचे घर खूप दूरवर, उंचावर होते. एका टप्प्यावर आल्यावर दूरवर निर्देश करत त्यांनी मला लाल रंगाचे एक घर दाखविले आणि म्हणाले ते माझे घर ! त्या घराच्या लाल रंगावरून काही गमतीदार किस्सा पण त्यांनी मला ऐकविला.

मी शांतपणेच चालत होते. आणि मध्येच ते एकदम थांबले आणि माझ्याकडे गर्रकन वळून म्हणाले, “आता तू माझ्या ताब्यात आहेस, तुला माझी भीती नाही वाटत?” मी ताबडतोब त्यांना उत्तर दिले की, ”माझा चैत्य पुरुष माझ्या जीवनाचे नियमन करतो, मी कोणालाच घाबरत नाही.” श्रीमाताजी पुढे सांगू लागल्या, ”हे उत्तर ऐकल्यावर, ते थक्कच झाले. खरोखर, थ्लेमसेनला जाण्यापूर्वी मला चैत्य जाणिवेची (Psychic Consciousness) प्राप्ती झालेली होती.” त्यामधूनच ती निर्भयता आलेली होती.

आधारित : Conversation with a Disciple Vol 13 : April 15, 1972
& Mother or The Divine Materialism : Pg 159-160

*