विनम्रतेची आवश्यकता ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी नेहमी बोलले जाते पण तिचा अर्थ समजण्यात नेहमीच चूक होते. ती चुकीच्या पद्धतीने घेतली जाते, तिचा अर्थ चुकीचा घेतला जातो आणि तिचा वापरही चुकीचा केला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर योग्य रीतीने विनम्र व्हा, परंतु चुकीच्या रीतीने विनम्र होण्यात काही अर्थ नाही, कारण त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे, जर तुम्ही तुमच्या मधून घमेंड नावाचे तण उपटून फेकून देऊ शकाल तर, खरोखरच तुम्ही काहीतरी साध्य केल्यासारखे होईल. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की ही गोष्ट किती कठीण आहे ते? तुमच्या लक्षात येईल की, एक प्रकारच्या आत्मप्रौढीयुक्त आत्म-समाधानाने फुलून गेलेले असल्याशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट नीट करू शकत नाही, तुम्हाला चांगले काही सुचत नाही, तुम्ही योग्य अशी कृती करत नाही किंवा त्या समाधानाने आतून फुललेले नसाल (भले तुम्हाला त्याची जाणीवही नसेल) तर तुम्ही किंचितही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला घणाचे घाव घालूनच, आत्मप्रौढी मोडून काढावी लागते. तरीदेखील काही अवशेष शिल्लक राहतातच आणि मग त्यांना मोड यायला सुरुवात होते.

व्यक्तीने त्यावर आयुष्यभर काम करत राहिले पाहिजे आणि या पुन्हा पुन्हा डोके वर काढणाऱ्या तणाला मुळापासून उपटून काढण्यासाठी काम करत राहणे कधीही विसरता कामा नये. कारण ते तण इतक्या बेमालूमपणे तुमच्यामध्ये असते की, तुम्हाला असे वाटते की, ती घमेंड, आत्मप्रौढी तुमच्यामधून निघून गेली आहे आणि तुम्ही स्वत:ला अगदी विनम्र, विनयशील समजत असता आणि म्हणता, “हे मी केलेले नाही, मला जाणवते आहे की, हे ईश्वरी आहे, जर तो ईश्वर नसेल तर मी कोणीच नाही.” आणि लगेचच पुढच्या क्षणी हा असा विचार केल्याबद्दल तुम्ही स्वत:वरच खूप खुष होऊन जाता.

*

प्रश्न : जेव्हा आम्ही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारु लागते आणि त्या तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि त्यातूनच सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सोडवणूक कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असते, निरीक्षण करत असते. आणि मग कधीकधी तो गर्विष्ठ होतो. मग साहजिकच आपल्या प्रयत्नांमधील बरेचसे सामर्थ्य तो काढून घेतो. ही एक अशी सवय आहे की, काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्ती स्वत:कडे पाहत असते.

स्वत:चे निरीक्षण करणे आवश्यकच आहे; परंतु मला वाटते, पूर्णपणे प्रामाणिक असण्याचा, सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे हे त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी स्वाभाविक असली पाहिजे म्हणजे व्यक्तीने सततच स्वत:चे निरीक्षण करणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, समाधानाने स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट तितकीच ही गोष्टही वाईट आहे; ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच घातक आहेत. व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये, इतकी ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

जेव्हा व्यक्ती ही स्व-केंद्रित राहत नाही, काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार राहत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात ती स्वत:च एक आस बनून जाते तेव्हा ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा आस बाळगणारी व्यक्ती शिल्लक राहत नाही, तर जेव्हा ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव आसच बनून राहते आणि ती पूर्ण एकाग्र आवेगाने झेपावते तेव्हा अशी व्यक्ती खरोखर खूप प्रगत होऊ शकते.

अन्यथा, नेहमीच त्यामध्ये एक प्रकारची क्षुद्र आत्मप्रौढी, एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, आणि एक प्रकारची स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आत शिरकाव करतात आणि सारे काही बिघडवून टाकतात. कठीण असते ते सारे !

*

प्रश्न : विनम्र असण्याची योग्य रीत आणि अयोग्य रीत कोणती?

श्रीमाताजी : ते ओळखणे अगदीच सोपे आहे. जेव्हा माणसांना सांगितले जाते की, ‘विनम्र व्हा’ तेव्हा ती ताबडतोब, ‘दुसऱ्या व्यक्तींसमोर विनम्र व्हायचे’ असा विचार करतात आणि इथेच विनम्रता चुकीची असते. खरी विनम्रता म्हणजे ईश्वरासमोर असणारी विनम्रता ! ही एक अगदी नेमकी अशी, अचूक, एक जिवंत अशी संवेदना असते की, आपण कोणीच नाही, आपण त्या ईश्वराशिवाय काहीच करू शकत नाही, आपल्याला त्या ईश्वराविना काहीच समजू शकत नाही. म्हणजे अगदी एखादा असामान्यपणे बुद्धिमान किंवा सक्षम असला तरीही, दिव्य चेतनेच्या तुलनेत ते काहीच नसते आणि ही जाण व्यक्तीने कायम बाळगली पाहिजे, कारण त्यामुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने ग्रहणशील होऊ शकते – ही अशी विनम्रता ईश्वरासमोर कोणताही आव आणत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 44-45), (CWM 06 : 402), (CWM 05 : 44-45)

श्रीमाताजी