आपल्या सामर्थ्याला नेहमी दिव्य शक्तीवरील श्रद्धेचा आधार असला पाहिजे. आणि जेव्हा त्या दिव्य शक्तीचा आविष्कार होतो त्यावेळी आपली श्रद्धा सर्वांगीण आणि परिपूर्ण असली पाहिजे किंवा झाली पाहिजे.

सनातन काळापासून अखिल-सृष्टी निर्माण करत असलेल्या आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमानतेने सुसज्ज असणाऱ्या अशा विश्वदेवतेला, जागृत चैतन्यमय विश्वशक्तीला अशक्य असे काहीच नाही. अखिल ज्ञानभांडार, सारी शक्तिसामर्थ्य, सर्व प्रकारचे यश आणि विजय, सर्व प्रकारची कर्मे आणि कौशल्यं तिच्याच हाती असून, ती सर्व, विविध प्रकारच्या पूर्णत्वांनी व सिद्धींनी आणि आत्म्याच्या संपदांनी संपन्न असतात.

ही ‘महेश्वरी’ आहे, सर्वोच्च ज्ञानदेवता आहे. सर्व प्रकारची सूक्ष्म दिव्य दर्शनशक्ती आणि सत्याची अपार असीमता, आध्यात्मिक संकल्पशक्तीची ऋजुता आणि तिच्या अतिमानसिक विशालतेची स्थिरता व उत्कटता त्याचबरोबर तिच्या प्रबोधन शक्तीचा परमानंद ती आपणास प्रदान करते.

ती ‘महाकाली’ आहे, सर्वोच्च सामर्थ्याची देवता आहे. सर्व दिव्यबल आणि आध्यात्मिक शक्तिसामर्थ्य तिचेच आहे. तप:शक्तीची उग्रतम तीव्रता आणि युद्धाभिमुख शीघ्र चपळता त्याचबरोबर पराजय, मृत्यू आणि अज्ञानशक्ती यांना क:पदार्थ लेखणारे अट्टहास्य व विजय तिच्याजवळ आहे.

ती ‘महालक्ष्मी’ आहे, सर्वोच्च प्रेम आणि दिव्यानंद यांची ती देवता आहे. आत्म्याचा कृपाप्रसाद, दिव्यानंदाची मोहिनी आणि सौंदर्य, त्याचबरोबर संरक्षण आणि सर्व प्रकारचे मानवी व दैवी आशीर्वचन हे तिचे वरदान आहे.

ती ‘महासरस्वती’ आहे, आत्म्याचे कर्म आणि दिव्य कौशल्य यांची ती देवता आहे. योग कर्मसु कौशलम्, दिव्य ज्ञानाचा उपयोग आणि जीवनामध्ये चैतन्याचे आत्म-उपयोजन आणि त्याच्या सुसंवादाचे सौख्य हा तिचा योग आहे. आणि तिच्या सर्वच रूपांमध्ये आणि शक्तींमध्ये, शाश्वत ‘ईश्वरी’च्या प्रभुत्वसंपन्नतेची परमश्रेष्ठ भावना ती तिच्यासोबत वागवत असते.

साधनाकडून अपेक्षित असलेली अशी सर्व प्रकारच्या कृतींची जलद आणि दिव्य क्षमता, एकत्व, सहभागी सहानुभूती, सर्व जीवांमधील सर्व शक्तींशी मुक्त अशी एकजीवता आणि या सगळयामुळे, विश्वामधील सर्व ईश्वरी संकल्पाशी एक उत्स्फूर्त आणि फलदायी अशी सुसंवादिता ती तिच्या सोबत वागवत असते. तिच्या अस्तित्वाची आणि तिच्या शक्तींची अतिशय सघन जाणीव होणे आणि आपल्या समग्र अस्तित्वाने, आपल्या सर्वांगामधील आणि आपल्या सभोवताली होणाऱ्या तिच्या कार्याविषयी समाधानपूर्वक स्वीकार करणे, ही महाशक्तीवरील श्रद्धेच्या परिपूर्तीची परमावधी असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 780-781)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)