ज्यांची आपण श्रीमाताजी म्हणून आराधना करतो, त्या म्हणजे अखिल अस्तित्वावर प्रभुत्व असणारी ईश्वराची चित्शक्ती आहेत. ती चित्शक्ती ‘एक’ असूनही इतकी ‘अनेकअंगी’ आहे की, तिच्या गतिविधींचे अनुसरण करणे हे अत्यंत चपळ मनाला किंवा सर्वस्वी मुक्त आणि अत्यंत विशाल बुद्धिलाही अशक्य असते. श्रीमाताजी ह्या परमेश्वराची चेतना आणि शक्ती असून, त्या त्यांनी निर्माण केलेल्या निर्मितीपासून, सृष्टीपासून खूपच दूर उच्चस्थानी आहेत.

परंतु असे असूनसुद्धा, श्रीमाताजींच्या कार्यपद्धतींमधील काही गोष्टी ह्या त्यांच्या मूर्त रूपांच्या द्वारे म्हणजे देवतारूपांच्या द्वारे आपणास पाहता आणि अनुभवता येऊ शकतात. कारण, ज्या देवतारूपांच्या माध्यमातून श्रीमाताजी, त्यांनी निर्माण केलेल्या जीवसृष्टीसमोर प्रकट होण्याचे मान्य करतात; त्या देवतारूपांचा स्वभाव आणि कार्य अधिक सुनिश्चित आणि समर्याद असते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून, श्रीमाताजींच्या कार्यपद्धती आपणास अधिक सुस्पष्टपणे आकलन होऊ शकतात.

श्रीमाताजींच्या चार शक्ती म्हणजे त्यांची चार अगदी अद्वितीय अशी व्यक्तिमत्त्वं आहेत, अंश आहेत, त्यांच्या दिव्यत्वाची मूर्त रूपं आहेत. ह्या रूपांच्या माध्यमातूनच त्या त्यांच्या प्राणिमात्रांवर कार्य करतात, त्यांना आदेश देतात, या जगतातील त्यांच्या निर्मितीमध्ये सुमेळ निर्माण करतात आणि ह्या रूपांच्या माध्यमातूनच त्यांच्या हजारो शक्तींच्या कार्याला श्रीमाताजी दिशा देतात. श्रीमाताजी एकच आहेत, परंतु त्या आपल्या समोर विभिन्न रूपे धारण करून येतात; त्यांच्या शक्ती आणि व्यक्तिमत्त्वे अनेक आहेत, त्यांचे अंशावतार आणि विभूतीही अनेक आहेत; हे सारेजण या विश्वामध्ये श्रीमाताजीचे कार्य करत असतात.

*

ह्या पार्थिव लीलेमध्ये श्रीमाताजींचा जो व्यवहार चालतो, त्यांचे ह्या विश्वाला जे मार्गदर्शन लाभते त्यामध्ये, श्रीमाताजींचे चार महान पैलू, चार नेतृत्वकारी शक्ती आणि त्यांची व्यक्तिमत्त्वे अग्रस्थानी आहेत.

महेश्वरी – श्रीमाताजींचे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शांत व्यापकता आणि आकलनकारी प्रज्ञा, प्रशांत कृपा आणि अक्षय करुणा आणि सार्वभौम व राज्यपदालाही मागे टाकणारी, सर्व-सत्ताक महत्ता.

महाकाली – दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमाताजींच्या गौरवशाली सामर्थ्याची शक्ती, दुर्दम्य आवेग, त्यांची युयुत्सू भाववृत्ती, त्यांची तीव्र इच्छा, त्यांची त्वेषपूर्ण चपळता आणि विश्वाला हलविणारी ताकद.

महालक्ष्मी – त्यांचे तिसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रफुल्ल, मधुर, सौंदर्याच्या गुप्त रहस्याची अद्भुतता, सुसंवाद, उत्कृष्ट लयतालबद्धता, जटिल व सूक्ष्म समृद्धी, श्रीमाताजींचे खिळवून ठेवणारे आकर्षण व मनोहर कृपा.

महासरस्वती – त्यांचे चौथे व्यक्तिमत्त्व हे, तादात्म्यातून येणाऱ्या ज्ञानाची घनिष्ठ व गभीर क्षमता; काळजीपूर्वक व निर्दोष असे कर्म आणि स्थिरता व सर्व गोष्टींमधील अचूक अशी परिपूर्णता, या साऱ्याने सुसज्ज असलेले असे असते.

प्रज्ञा, सामर्थ्य, सुसंवाद आणि परिपूर्णता असे त्यांचे विविध गुणधर्म आहेत. ह्याच शक्तींसमवेत श्रीमाताजींची वरील चारही व्यक्तिमत्त्वं ह्या जगतामध्ये (मानवी प्रमाणात) येतात. त्यांच्या या शक्ती विभूतींच्या माध्यमातून (अर्ध-दैवी प्रमाणात) मानवी रूप धारण करून, आविष्कृत होतात. श्रीमाताजींच्या थेट व जिवंत प्रभावाला जी व्यक्ती स्वत:ची पार्थिव प्रकृती खुली करू शकते, तिच्या आरोहणामध्ये, हे गुणधर्म तिच्यामध्ये ईश्वरी प्रमाणात आढळून येतात. या चारही व्यक्तिमत्त्वांना आम्ही चार महान नावं दिली आहेत, महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14 & 17-18)

श्रीअरविंद