इ. स. १९७२ च्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींना येणाऱ्या वर्षाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते, त्यांच्या साधनेतील अवस्थेविषयी होते, परंतु ते उत्तर सद्य परिस्थितीलाही चपखल लागू पडते असे वाटते, म्हणून येथे देत आहोत… दर क्षणी आपली प्रार्थना काय असावी ह्याचेही मार्गदर्शन यामध्ये आले आहे.

प्रश्न : नूतन वर्षाचा आरंभ होऊ घातला आहे… या नूतन वर्षाबाबत काही विशेष असे तुम्हाला जाणवते आहे का?

श्रीमाताजी : गोष्टींनी अगदी चरम रूप धारण केले आहे. त्यामुळे जणू काही संपूर्ण वातावरणाचे कल्पनातीत अशा उज्ज्वलतेप्रत उन्नयन केले जात आहे. परंतु त्याच वेळी अशीही संवेदना होत आहे की, कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकेल – अगदी ”मृत्यू पावू शकेल” असेही नाही, परंतु देह विसर्जित होऊ शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून एक अशी जाणीव उदयाला येत आहे की, ज्यामध्ये… साऱ्या गतगोष्टी पोरकट, बालीश, चेतनाशून्य भासत आहेत… हे विलक्षण व विस्मयकारक आहे.

परंतु या देहाची सदैव एकच प्रार्थना असते, ती अशी की,

तुला जाणून घेता यावे यासाठी मला सुपात्र बनव.
तुझी सेवा करता यावी यासाठी मला सुयोग्य बनव.
मी तूच व्हावे यासाठी मला सक्षम कर.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 330)

श्रीमाताजी