‘ल्हासा’ या गावामध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती अलेक्झांड्रा डेव्हिड नील ह्या पहिल्या युरोपियन बुद्धमार्गी महिला होत्या. त्यांचा तिबेटचा प्रवास खूप कष्टप्रद होता. नील जेव्हा एका जथ्याबरोबर तिबेटकडे जायला निघाल्या होत्या. तेव्हाची ही गोष्ट आहे. त्याकाळात इंडो-चायना मार्गे तिबेटमध्ये जाणे तुलनेने सोपे असल्याने नील त्या मार्गाने निघाल्या होत्या. नरभक्षक वाघांची वस्ती असलेल्या जंगलातून त्यांची वाट जात होती. नील रोजच्या रोज ठरावीक वेळी ध्यानास बसत असत. एक दिवसाचाही कधी खंड पडू देत नसत. जेव्हा त्या घनदाट अरण्यातून चालल्या होत्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांची रोजची ध्यानाची वेळ झाली आहे.

म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत्यांना सांगितले,”तुम्ही पुढे व्हा, माझे ध्यान आटोपले की मी येतेच.”

त्यांच्या काळजीने त्यांचे सहप्रवासी घाबरून गेले. त्यांनी नीलला खूप समजावून पाहिले, “येथे थांबणे धोकादायक आहे. तुम्ही आमच्याबरोबर चला.”

त्यांनी असे वारंवार सांगून पाहिले पण व्यर्थ ! त्या आपल्या निर्णयावर अडिग होत्या.

शेवटी नाईलाजाने सहप्रवासी पुढे निघून गेले. त्या ध्यानाला बसल्या. थोड्या वेळाने त्यांना एका अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना काय दिसले? एक नरभक्षक वाघ त्यांना गिळंकृत करण्याच्या तयारीत अगदी तीनचार टप्प्यांच्या अंतरावर उभा होता.

तेव्हा एखाद्या सिद्ध अशा बुद्धवाद्याप्रमाणे त्यांनी विचार केला,”मला जर अशाच मार्गाने निर्वाण मिळणार असेल, तर ठीक आहे. मी तयार आहे. मला आता माझा देह फक्त योग्य प्रकारे, योग्य वृत्तीने सोडावयाचा आहे इतकेच.” असे मनाशी म्हणत त्या ध्यानाला बसल्या. पाच मिनिटे, दहा मिनिटे, अर्धा तास निघून गेला. त्यांनी ध्यानातून बाहेर आल्यावर डोळे उघडून पाहिले… वाघ निघून गेला होता. नील मग शांतपणे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या आणि सहप्रवाशांना म्हणाल्या,”ही मी आले आहे.”

-श्रीमाताजी

(CWM 9:53-54)

अभीप्सा मराठी मासिक