चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान पुढीलप्रमाणे :
१) चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान म्हणजे प्रेम आणि भक्ती होय, पण प्राणिक प्रेम नव्हे, अपेक्षा बाळगणारे, अहंकारी प्रेम नव्हे तर, कोणत्याही अटी, दावे नसलेले, स्वयंभू असे प्रेम.
२) अंतरंगातील दिव्य मातेशी संपर्क किंवा दिव्य मातेची उपस्थिती.
३) अंतरंगातून मिळणारे अचूक मार्गदर्शन.
४) चैत्य पुरुषाच्या प्रभावाचे व मार्गदर्शनाचे अनुसरण केल्याने मन, प्राण व शारीर जाणिवेचे शांत होणे व शुद्धीकरण घडून येणे.
५) उच्चतर आध्यात्मिक चेतनेचे, स्वीकारक्षम झालेल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी, कनिष्ठ जाणिवांचे उच्च आध्यात्मिक चेतनेप्रत खुले होणे – चैत्य जाणिवेमुळे प्रत्येक गोष्टीत योग्य विचार, योग्य आकलन, योग्य भावना, योग्य दृष्टिकोन तयार होतो आणि अशा योग्य दृष्टिकोनानिशी, परिपूर्ण ग्रहणक्षमतेने कनिष्ठ चेतना उच्च चेतनेप्रत खुली होते.
एखादी व्यक्ती मन, प्राण यांच्यामधून स्वत:ची चेतना वर उंचावू शकते आणि उच्च स्तरावरील शक्ती, आनंद, प्रकाश, ज्ञान खाली आणू शकते परंतु, हे खूप अवघड असते आणि त्यातही त्याच्या परिणामांची खात्री देता येत नाही. आणि जर जीव त्यासाठी तयार झालेला नसेल, किंवा त्याचे पुरेसे शुद्धीकरण झालेले नसेल तर ते धोकादायक देखील असते. जाणिवपूर्वकतेने चैत्यपुरुषाच्या माध्यमातून आरोहण करणे, हा सर्वात चांगला मार्ग आहे. अशा प्रकारे जर तुम्ही चैत्य केंद्रातून आरोहण करत असाल तर ते अधिक बरे.
– श्रीअरविंद
(CWSA 30 : 339)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १७ - September 24, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १५ - September 22, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १२ - September 19, 2023