प्रश्न : चैत्य पुरुष मुक्त होतो म्हणजे नेमके काय घडते?

श्रीमाताजी : बरेचदा साधनेच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होते. ती भावना अशी असते की, जणु चैत्य पुरुष हा एखाद्या कठीण अशा कवचामध्ये, तुरुंगामध्ये बंदिस्त झालेला आहे आणि हीच गोष्ट त्याच्यातील चैत्य पुरुषाला बाह्यत: आविष्कृत होण्यापासून आणि बाह्यवर्ती चेतनेशी, बाह्य व्यक्तित्वाशी जागृत आणि सातत्यपूर्ण संबंध जोडण्याला प्रतिबंध करते.

एखाद्या पेटीमध्ये आपण बंदिस्त झालो आहोत किंवा ज्याच्या भिंती फोडून बाहेर पडावयास हवे, अशा एखाद्या तुरुंगात आहोत किंवा असे एखादे दार असावे की, ज्याच्या आत प्रवेश करावयाचा तर बलप्रयोग करावा लागेल, अशी काहीशी ही भावना असते. तेव्हा साहजिकच, जर एखादा कोणी ती भिंत पाडू शकला, ते दार उघडू शकला, तर आत बंदिस्त असलेला चैत्य पुरुष मुक्त होतो आणि आता तो बाह्यत: देखील आविष्कृत होऊ शकतो. ह्या सगळ्या प्रतिमा आहेत.

प्रत्येक व्यक्तीची, स्वभावत:, स्वत:ची अशी वैयक्तिक प्रतिमा असते, कमीअधिक फरकाने, तिची स्वत:ची एक वैयक्तिक पद्धत असते. ज्यांनी ज्यांनी ह्याची अनुभूती घेतलेली आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत, काही प्रतिमा सर्वांनाच समानतेने अनुभवास आलेल्या असतात.

उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती चैत्य पुरुषाचा शोध घेण्यासाठी, स्वत:च्या चेतनेच्या तळाशी खोल जाऊन पोहोचते, तेव्हा ती जणू काही विहिरीमध्ये खूप खाली, खाली, खाली उतरत आहे आणि जणू काही ती आता त्या विहिरीमध्ये अगदी तळाशी जाणार अशी भावना असते, प्रतिमा असते. हे तर उघडच आहे की या उपमा आहेत; परंतु अनुभवाचा मनावर जो ठसा उमटतो त्याच्याशी साधर्म्य राखणाऱ्या ह्या उपमा आहेत आणि त्यातून त्या अनुभवाची सघन अशी प्रचिती येते आणि त्यातून फार मोठी ताकद मिळते.

उदाहरणार्थ, व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाच्या शोधास सुरुवात करते किंवा ती स्वत:च्या विविध अंगांच्या शोधास सुरुवात करते, तेव्हा तिची बरेचदा अशी भावना होते की, ती जणू काही एका हॉलमध्ये किंवा खोलीमध्ये आतवर प्रवेश करते आहे. तेथील रंग, तेथील वातावरण, त्या खोलीमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे व्यक्ती अस्तित्वाच्या कोणत्या अंगाला भेट देत आहे ह्याचे स्पष्ट आकलन होऊ शकते. आणि मग, व्यक्ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते, दरवाजे उघडते आणि अधिकाधिक आतल्या आतल्या खोल्यांमध्ये प्रवेश करत जाते, त्यातील प्रत्येक खोलीचे स्वत:चे असे एक स्वरूप असते. आणि बऱ्याचदा, हा आंतरिक प्रवास, ह्या आंतरिक भेटी रात्रीच्या वेळी घडून येतात. तेव्हा त्याला स्वप्नासारखे, अधिक सघन असे रूप प्राप्त होते आणि व्यक्तीला असे जाणवते की, जणू ती एखाद्या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि ते घर तिच्या खूप परिचयाचे आहे.

आणि काळ, वेळेनुसार आंतरिक गोष्टी भिन्न भिन्न असतात. कधीकधी तेथे एक प्रकारची अत्यंत अव्यवस्था असते, सावळा गोंधळच असतो म्हणा ना, जेथे सर्व काही एकमेकांत मिसळून गेलेले असते, कधीकधी तोडक्यामोडक्या गोष्टीपण असतात, एकूणातच एक प्रकारचा गोंधळ असतो. तर कधी कधी, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवलेल्या असतात, जणू काही कोणीतरी घर नीट आवरलेले असावे, घरातील गोष्टी स्वच्छ केलेल्या असाव्यात, व्यवस्थितपणे ठेवलेल्या असाव्यात. आणि गंमत म्हणजे, घर मात्र नेहमी तेच असते. घर ही तुमच्या आंतरिक अस्तित्वाची एक प्रकारची वस्तुनिष्ठ प्रतिमा आहे. आणि तेथे तुम्ही जे पाहता, तेथे जे काही करता, ते तुमच्या मानसिक कार्याचे प्रतीकात्मक रूप असते. मूर्त रूप येण्यासाठी ह्या गोष्टी उपयुक्त असतात. पण हे माणसामाणसांवर अवलंबून असते.

काही माणसं फक्त बुद्धिवादी असतात आणि त्यांच्या बाबतीत मग प्रत्येक गोष्ट ही संकल्पनांमध्ये व्यक्त होते, प्रतिमांमध्ये नाही. परंतु ते जर जडभौतिक प्रांतामध्ये अधिकाधिक खोलवर जात राहिले तर हा धोका असतो की, ते मूर्त वास्तवाला स्पर्श करू शकत नाहीत आणि केवळ संकल्पनांच्या प्रांतातच राहतात, मनाच्या प्रांतातच वावरतात आणि तेथेच अनंतकाळपर्यंत राहू शकतात. आणि जरी ती काहीशी अनिश्चित, अपरिमित अशी गोष्ट असली तरी त्यांना असे वाटू लागते की, ते प्रगती करत आहेत, मानसिकरित्या त्यांची प्रगती झाली आहे इ. इ. मन हे असे एक अतिविशाल, आणि अपरिमित असे क्षेत्र आहे की, जे सातत्याने नवीकृत (renewed) होत राहते. परंतु जर का एखाद्याला प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर, ज्याविषयी आपण आधी बोललो ते प्रतिमात्मक प्रतिनिधित्व कृती निश्चित करण्यासाठी, ती कृती अधिक सघन बनविण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

अर्थातच ही गोष्ट काही पूर्णत: व्यक्तीच्या इच्छेबरहुकूम होत नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु ज्या कोणाकडे प्रतिमांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती असते त्यांना अजून एक सुविधा उपलब्ध असते.

ध्यानामध्ये, एका बंद दरवाजासमोर बसावयाचे. जणू काही ते पोलादी भरभक्कम दार असावे – आणि ते दार उघडावे आणि दाराच्या दुसऱ्या बाजूला जावे अशी इच्छा बाळगून त्या दारासमोर बसावयाचे. आणि संपूर्ण लक्ष, संपूर्ण अभीप्सा ही जणू काही एका घणामध्ये एकत्रित होते आणि त्याने दारावर घाव घातले जाताहेत, जाताहेत, आणि अधिकाधिक चढत्या वाढत्या शक्तीने व्यक्ती ते घाव घालत राहते.. जोपर्यंत ते दार एकदम उघडले जात नाही आणि व्यक्तीचा आत प्रवेश होत नाही तोपर्यंत हे चालू राहते. ह्याचा खूप जोरदार ठसा उमटतो.

जणू काही व्यक्ती प्रकाशामध्येच झेप घेते, ती व्यक्ती त्या प्रकाशाने पूर्ण उजळून निघते आणि तिला अचानक, एकाएकी जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्याचा आनंद लाभतो; आपण कोणी निराळीच व्यक्ती बनलो असल्याचे तिला जाणवू लागते.

स्वत:च्या चैत्य अस्तित्वाशी संबंध प्रस्थापित करण्याचा हा एक अतिशय सघन आणि शक्तिशाली मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 266-268)