जे अस्तित्व आपल्यामधील इतर सर्व बाबींना आधार पुरविते आणि जन्म आणि मृत्युच्या फेऱ्यांमधूनही जे टिकून राहते अशा आपल्यातील ईश्वरांशाला, सहसा आपल्या योगामध्ये ‘केंद्रवर्ती अस्तित्व’ अशी संज्ञा वापरण्यात येते.

केंद्रवर्ती अस्तित्वाची दोन रूपे असतात – वरच्या भागात असणारे अस्तित्व म्हणजे जीवात्मा, आपले सत् अस्तित्व. आपल्याला जेव्हा उच्चतर असे आत्म-ज्ञान प्राप्त होते तेव्हा, आपल्याला ह्या अस्तित्वाची जाण येते. खालील भागात, मन, प्राण व शरीर यांच्या पाठीशी उभा असतो तो चैत्य पुरुष.

जीवात्मा हा जीवनामध्ये होणाऱ्या आविष्करणाच्या वर असतो आणि तेथून तो जीवनाचे संचालन करत असतो. तर चैत्य पुरुष हा मागे उभा राहून जीवनाच्या आविष्करणाला आधार पुरवीत असतो.

आपण बालक आहोत, ईश्वराचे मूल आहोत, भक्त आहोत असे वाटणे हा, चैत्य पुरुषाचा स्वाभाविक दृष्टिकोन असतो. चैत्य पुरुष हा ईश्वराचाच एक अंश असतो, तत्त्वत: तो एकच असतो परंतु या आविष्करणाच्या गतिविधींमध्ये या एकत्वामध्येही नेहमीच भिन्नता आढळून येते. या उलट, जीवात्मा, हा साररूपामध्येच जगत असतो आणि तो ईश्वराच्या एकत्वामध्ये स्वत:चा विलय करू शकतो. पण तो सुद्धा ज्या क्षणी जीवनामधील आविष्करणाच्या गतिविधींचे अध्यक्षपद स्वीकारतो, संचालन करू लागतो, त्या क्षणी तो स्वत:ला विविधरूपी ईश्वराच्या अनेक केंद्रांपैकी आपण केवळ एक केंद्र आहोत असे मानू लागतो, तेव्हा तो स्वत:ला परमेश्वर मानत नाही.

हा भेद लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. नाहीतर, जर का कोठेही थोडा जरी प्राणिक अहंकार असेल तर, व्यक्ती स्वत:ला अवतार समजायला लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 61)

*

आत्मा हा त्याच्या प्रकृतीनुसार एकतर विश्वातीत (परमात्मा) (Transcendent) असतो किंवा वैश्विक (आत्मा) (Universal) असतो. जेव्हा तो व्यक्तिरूप धारण करतो आणि केंद्रवर्ती अस्तित्व बनतो, तेव्हा तो जीवात्मा असतो. जीवात्म्याला विश्वाशी एकत्व जाणवत असते पण त्याचवेळी, ईश्वराचा एक भाग या नात्याने त्याला केंद्रीय पृथगात्मकतेची (central separateness) देखील जाणीव असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 55)

श्रीअरविंद