सत्यशोधनासाठी विचारांच्या माध्यमातून उन्नत होणे
जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे ह्या हेतूने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे ह्याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतूने, आजवर त्याला सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार झाला आहे; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा प्रचंड विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.
मग पुष्कळशा ध्यानानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.
अगदी दोष, अज्ञान ह्या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे त्याला कोणताही दोष त्रास देत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”दोष हा सत्याच्या दिशेने चाललेला जीवनाचा पहिलावहिला प्रयत्न असतो.”
अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 28)
- तारुण्य आणि वार्धक्य - June 24, 2026
- शाश्वत तारुण्याचा आश्रय - June 23, 2026
- तारुण्य म्हणजे काय? - June 21, 2026





