(मनामध्ये यंत्रवतपणे विचारांचा जो गदारोळ चालू असतो, त्याविषयीचे विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी पुढे सांगत आहेत)

तुमच्यावर आक्रमकपणे चालून येणाऱ्या असंबद्ध विचारांच्या पूराला, त्यांत वस्तुनिष्ठता आणण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने, पद्धतशीरपणे जर का तुम्ही दूर अंतरावर ठेवू शकलात तर, एक नवीनच बाब तुमच्या लक्षात येईल.

तुमच्या असे निदर्शनास येईल की, तुमच्यामधील काही विचार हे इतर विचारांपेक्षा अधिक प्रभावी आहेत, अधिक चिवट आहेत, ते विचार सामाजिक दृष्ट्या उपयुक्त, रीतीपरंपरांशी, नीतिनियमांशी आणि तसेच ह्या पृथ्वीचे आणि मनुष्यमात्राचे नियमन करणाऱ्या कायद्यांशीही संबंधित आहेत. ती तुमची त्या विषयांवरील मतं असतात किंवा तसा तुमचा दावा असतो आणि त्या नुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता.

तुमच्या त्या संकल्पनांपैकी एखाद्या संकल्पनेकडे पाहा, तुम्हाला जी जास्त परिचयाची आहे तिच्याकडे पाहा, अगदी काळजीपूर्वक पाहा, एकाग्र व्हा, अगदी पूर्ण प्रामाणिकपणे चिंतन करा, सर्व प्रकारचे पूर्वग्रह शक्य तितके बाजूला ठेवा आणि स्वत:ला विचारा की, या विषयावर तुमचे अमुक एक मत का आहे आणि तमुक एक मत का नाही.

प्रत्येक वेळी उत्तर बहुधा एकच असेल किंवा त्यासारखेच असेल कारण तुमच्या भोवतालच्या परिघात ते मत बहुधा प्रचलित असते आणि ते मत असणे हे चांगले मानले जाते आणि त्यामुळे अनायसे अनेकविध मतभेद, संघर्ष, टिकाटिप्पणी यांपासून तुमची सुटका होते. किंवा मग ते तुमच्या आईचे किंवा वडिलांचे मत असते, त्या विचारांनी तुमचे बालपण घडविलेले असते. किंवा ते मत म्हणजे, तुमच्या तरुणपणी तुम्ही घेतलेल्या धार्मिक म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा तो स्वाभाविक परिणाम असतो. तो विचार तुमचा स्वत:चा विचार नसतो.

कारण, एखादा विचार तुमचा ‘स्वत:चा’ आहे असे म्हणण्यासाठी, तुमच्या जीवनादरम्यान निरीक्षण, अनुभव वा अनुमानातून, किंवा, अगदी सखोल चिंतनमननातून तयार झालेल्या तुमच्या तर्कशुद्ध विचारविश्वाचा तो एक भाग बनावा लागतो.

मनामध्ये व्यवस्था आणणे

आपल्यामध्ये सदिच्छा आहे आणि पूर्णतया प्रामाणिक असण्याचा आपला प्रयत्न आहे, म्हणजे आपल्या विचारांनुसारच आपल्या कृती असाव्यात असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्याला आता हे पटले आहे की, बाहेरून येणाऱ्या मनाच्या दंडकांनुसार आपण कृती करतो; ते दंडक आपण हेतुपुर:सर किंवा जाणीवपूर्वकतेने स्वीकारतो असेही नाही, तर आपल्या जडणघडणीमुळे, शिक्षणामुळे आपल्या नकळत पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याकडे ओढले जातो, आणि त्या सगळ्यांपेक्षाही सामूहिक सूचनेचा आपल्यावर जबर पगडा असतो; ती सूचना इतकी शक्तिशाली, प्रभावी असते की, तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्यामध्ये फारच कमी लोक यशस्वी होतात.

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो त्या मानसिक पृथगात्मतेपासून (Mental individuality) आपण किती दूर आहोत! आपल्या गतकाळातील इतिहासाने निश्चित केलेली, आणि आपल्या समकालीनांची अंध आणि अनिर्बंध इच्छा ज्यांवर लादली जाते अशी उत्पादने आपण आहोत. हे खूपच दयनीय असे दृश्य आहे… पण आपण खचून जायला नको ; जेवढा जास्त गंभीर आजार आणि उपाय शोधायची निकड जेवढी जास्त, तेवढ्या प्रमाणात आपण अधिक उत्साहाने त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे.

पद्धत नेहमी एकच असणार : चिंतन, चिंतन आणि चिंतन.

आपण त्या साऱ्या संकल्पना, कल्पना एकापाठोपाठ एक विचारात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या सर्वसाधारण जाणिवेला, आपल्या तर्कबुद्धीला, समतेच्या सर्वोच्च जाणिवेला स्मरून आपण त्यांचे विश्लेषण केले पाहिजे; आपण आजवर प्राप्त करून घेतलेले ज्ञान आणि अनुभवांचे संचित यांच्या तराजूमध्ये त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे आणि मग त्यांची एकमेकांबरोबर संगती जुळविली पाहिजे, त्यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित केला पाहिजे. हे काम नेहमीच अवघड असते कारण अगदी परस्परविसंगत अशा कल्पना आपल्या मनामध्ये शेजारीशेजारी राहू देण्याची खेदजनक प्रवृत्ती आपल्यामध्ये असते.

त्या सर्व कल्पना आपण त्यांच्या योग्य जागी ठेवल्या पाहिजेत, आपल्या आंतरिक कक्षामध्ये सुव्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील खोल्या आवरतो, नीटनेटक्या राखतो त्याप्रमाणे हे काम आपण दररोज केले पाहिजे. कारण मला वाटते, जशी आपण घराची काळजी घेतो किमान तेवढीतरी काळजी आपण आपल्या मनाची घेतली पाहिजे. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की, हे कर्म खरेखुरे परिणामकारक होण्यासाठी, मनाची सर्वोच्च, अतीव शांत, अत्यंत प्राजंळ अशी स्थिती आपलीशी व्हावी यासाठी ती कायम टिकवून ठेवण्याची धडपड केली पाहिजे.

ज्या विचारांचे आपण निरीक्षण, विश्लेषण, वर्गीकरण करू इच्छितो ते विचार आपल्यातील आंतरिक प्रकाशाने उजळून निघावेत म्हणून आपण पारदर्शक बनूया. आपल्या स्वत:च्या अगदी क्षुल्लक आवडीनिवडी आणि क्षुद्र वैयक्तिक सोयीसुविधा यांच्या वर उठण्याइतपत आपण नि:पक्षपाती आणि धैर्यशाली बनूया. या विचारांकडे आपण केवळ विचार म्हणूनच, कोणत्याही पूर्वग्रहाविना बघूया.

थोडे थोडे करून, जर वर्गीकरणाच्या या कामात आपण चिकाटी बाळगली तर आपल्या मनांमध्ये प्रकाश आणि सुव्यवस्था घर करून राहतील. पण आपण हे विसरता कामा नये की, आपण भविष्यात प्रत्यक्षात आणू इच्छितो त्याच्या तुलनेत, ही व्यवस्था म्हणजे व्यवस्था नसून सावळा गोंधळच आहे. कालांतराने आपण जो प्रकाश ग्रहण करू शकू त्या प्रकाशाच्या तुलनेत, हा प्रकाश म्हणजे प्रकाश नसून काळोखच आहे.
जीवन हे सतत उत्क्रांत होत आहे; जर का आपण एक जिवंत मानसिकता इच्छित असू तर आपण अविरतपणे प्रगत होत राहिलेच पाहिजे.

हे फक्त प्राथमिक काम आहे. ज्ञानाच्या अनंत स्रोतांशी ज्यायोगे आपला संबंध प्रस्थापित होऊ शकेल अशा खऱ्या विचारांपासून आपण अनंत योजने दूर आहोत.

आपल्या विचारांवर व्यक्तिपर नियंत्रण ठेवता यावे म्हणून आपल्याला द्यावयाच्या क्रमशः प्रशिक्षणातील हे काही थोडेसे प्रयोग आहेत. कारण ज्या कोणाला ध्यान करावयाचे आहे त्याच्यासाठी मानसिक कृतीवर नियंत्रण हे अगदी अनिवार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 25-26)

श्रीमाताजी