(श्रीमाताजी जाणीव विशाल कशी करावी ह्या संबंधीचे मार्गदर्शन करत आहेत..)
अजून एक मार्ग आहे. तो म्हणजे पृथ्वीवरील सर्व गोष्टींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या गोष्टीविषयीचा तुमचा दृष्टिकोन संकुचित असतो आणि दुसऱ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची धारणा यामुळे तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही तुमची जाणीव बदलून ती दुसऱ्याच्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांच्या विचार करण्याच्या भिन्नभिन्न पद्धतींशी एकरूप होण्याचा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे.

पण हा मार्ग… काहीसा धोक्याचा आहे. कारण दुसऱ्यांच्या विचारांशी आणि इच्छांशी एकरूप होणे म्हणजे त्यांच्या ढीगभर मूर्खपणाशी व वाईट इच्छांशी एकरूप होण्यासारखे आहे. (श्रीमाताजी हसतात.) आणि त्याचे असे काही परिणाम होऊ शकतात की, जे तितकेसे इष्ट नसतात. तरीसुद्धा काही लोक हे सहजपणे करत असतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी त्यांचा दुसऱ्यांशी मतभेद होतो, तेव्हा ते आपली जाणीव विशाल करण्यासाठी दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण आहोत असे समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टींकडे स्वत:च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जाणीव विशाल होते; पण मी आधी सांगितलेल्या पद्धतींमुळे जाणीव जेवढी विशाल होते, तेवढी ती या पद्धतीमुळे होत नाही. त्या पद्धती अधिक निरुपद्रवी असतात. त्या पद्धतींनी तुम्हाला काही अपाय होत नाही, तर त्यांचा तुम्हाला लाभच अधिक होतो. त्या पद्धती तुम्हाला अधिक शांत करतात.

जाणीव व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती लहानशी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय व्हाल ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

जर तुम्हाला अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-346)