जाणीव स्वत:ला कोठे राखते आणि ती स्वत:ला कोठे केंद्रित करते यावर सारे काही अवलंबून आहे. जर जाणीव स्वत:ला अहंकाराशी संबधित राखील किंवा तेथे ठेवेल तर तुम्ही अहंकाराशी एकरूप होऊन जाता.

जर जाणीव मनाशी आणि त्याच्या चलनवलनाशी, तत्सम गोष्टींशी एकात्म पावेल तर ती तशी होईल. जर ती जाणीव बाह्यावर भर देईल, तर ती बहिवर्ती अस्तित्वामध्येच स्वत:चे ठाण मांडेल आणि आंतरिक मन, प्राण आणि आंतरतम असणाऱ्या चैत्याशी अनोळखी होऊन जाईल.

जर जाणीव आत वळली आणि तिने तिथे भर दिला तर तिथे ती स्वत:ला आंतरिक पुरुष म्हणून ओळखते, किंवा अधिक खोलवर गेली तर ती स्वत:ला चैत्य पुरुष म्हणून ओळखते; जर ती देहाच्या बाहेर असलेल्या पातळ्यांवर चढून गेली तर, ज्या आत्म्याला स्वाभाविकपणेच त्याच्या विशालतेचे आणि मुक्ततेचे भान असते त्या आत्म्याशी तद्रूप होऊन, ती स्वत:ला शरीर, प्राण वा मन म्हणून नव्हे तर, आत्मा म्हणून ओळखते.

जाणीव कशावर भर देते त्यावरून सर्व फरक पडतो. म्हणूनच व्यक्तीने तिची चेतना अंतरंगामध्ये किंवा वरती नेण्यासाठी, हृदयामध्ये किंवा मनामध्ये केंद्रित केली पाहिजे. चित्तवृत्तीच हे सर्व काही ठरवते; ही चित्तवृत्तीच व्यक्तीला मनोप्रधान, प्राणप्रधान, शरीरप्रधान किंवा आत्मप्रधान अशा स्वरुपाची बनवते. तीच तिला बंधनात अडकवते किंवा बंधमुक्त करते; पुरुषाप्रमाणे साक्षी बनवते किंवा प्रकृतीप्रमाणे गुंतवून ठेवते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 20-21)