श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, अध्यात्म आणि सर्व धर्म भूतकालीन व्यक्तिमत्त्वांभोवती, विभूतींभोवती केंद्रित असत, आणि ‘पृथ्वीवरील जीवनास नकार’ ह्या उद्दिष्टाकडे निर्देश करीत असत. तेव्हा, तुम्हाला दोन पर्यायामधून निवड करावयाची असे : एक मार्ग म्हणजे सुखदुःख, आनंद व दु:खभोग यांच्या रहाटगाड्यामध्ये फिरत असलेले, आणि जर तुम्ही योग्य आचरण केले नाहीत तर, नरकवासाची धमकी देणारे ‘इहलोका’तील, ह्या जगातील जीवन आणि किंवा दुसरा पर्याय म्हणजे, दुसऱ्याच विश्वामध्ये, ‘परलोका’मध्ये पलायन, स्वर्ग, निर्वाण, मोक्ष, मुक्ती ….या दोहोंमधून एकाची निवड करणे हे तितकेसे चांगले नाही. कारण दोन्ही पर्याय सारखेच वाईट आहेत. श्रीअरविंदांनी आपल्याला हे सांगितले आहे की, हीच मूलभूत चूक आहे की, ज्यामुळे भारतामध्ये दुर्बलता आली, भारताचे अवमूल्यन झाले.

….या पार्थिव जीवनापासून पलायन करून सत्य गवसणार नाही तर त्यामध्येच राहून, त्याचे परिवर्तन करून, त्याला दिव्य बनविण्यामध्येच सत्य सामावलेले आहे; असे केल्याने या ‘भौतिक जगा’मध्येच ईश्वराचे आविष्करण घडून येईल, हे श्रीअरविंदांनी दाखवून दिले.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 210-211)

*
प्रत्येक धर्मामुळेच मानवजातीला मदत झाली आहे. ‘पेगानिझम’ मुळे (रोमन साम्राज्यातील शेतकऱ्यांचा धर्म) माणसाच्या सौंदर्याच्या प्रकाशामध्ये, जीवनाच्या व्यापकतेमध्ये आणि उंचीमध्ये भर पडली आहे; बहुआयामी पूर्णत्व हे ध्येय ठरविण्यास त्याला मदत झाली आहे. ख्रिश्चन धर्माने मानवाला दिव्य प्रेम आणि औदार्य या विषयी काही दृष्टी प्रदान केली आहे. बुद्धधर्माने मानवाला अधिक प्रज्ञावान, अधिक सौम्य, अधिक शुद्ध बनविण्याचा उमदा मार्ग दाखविला आहे. ज्यू आणि इस्लाम धर्माने आपल्या कार्यामध्ये धार्मिक-निष्ठावान कसे असले पाहिजे आणि ईश्वराप्रत उत्साहपूर्ण भक्ती कशी असली पाहिजे हे दाखविले आहे. हिंदुधर्माने अत्यंत विशाल आणि गाढ अशा आध्यात्मिक शक्यता मानवापुढे खुल्या केल्या आहेत. ईश्वरविषयक हे सर्व दृष्टिकोन अंगीकारले गेले आणि एकमेकांमध्ये प्रक्षेपित झाले तर किती चांगले होईल; पण या मार्गामध्ये बौद्धिक सिद्धान्त आणि सांप्रदायिक अहंवाद आडवे येतात. आजवर अनेक धर्मांमुळे असंख्य ‘जीव’ तरून गेले आहेत पण, यांपैकी कोणीही ‘मानवजाती’चे आध्यात्मिकीकरण करू शकलेला नाही. यासाठी कोणत्या एका पंथाची, कोणत्या एका संप्रदायाची नव्हे तर, आध्यात्मिक आत्म-उत्क्रांतीच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
– श्रीअरविंद
(SABCL 16 : 394)

श्रीअरविंद