धार्मिक मते आणि धार्मिक सिद्धान्त ह्या मनोनिर्मित गोष्टी असतात आणि जर तुम्ही त्यालाच चिकटून राहिलात आणि तुमच्यासाठी बनविलेल्या जीवनविषयक कायद्यांच्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त करून घेतलेत तर या नियमांच्या, धर्मसिद्धान्तांच्या पलीकडे असलेल्या, व्यापक, महान, मुक्त अशा चैत्यनाचे सत्य तुम्हाला गवसू शकणार नाही. विश्वातील एकमेव सत्य असे गृहीत धरून, जेव्हा तुम्ही एखाद्या धार्मिक संप्रदायापाशीच थांबता, त्याच्याशी स्वत:ला जखडून घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात्म्याच्या विस्ताराची आणि विकासाची प्रक्रिया गमावून बसता.

पण जर तुम्ही धर्माकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, धर्म नेहमीच सगळ्या माणसांना अडथळा ठरतो असे नाही. मानवाचे उच्चतर कार्य, ह्या दृष्टीने जर तुम्ही त्याकडे पाहिलेत आणि मानवनिर्मित गोष्टींच्या अपूर्णतांकडे दुर्लक्ष न करता, त्याकडे मानवाची आकांक्षा म्हणून पाहिलेत तर आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी धर्माचे तुम्हाला एकप्रकारे साहाय्यदेखील होऊ शकते.

धर्माकडे गंभीरतेने आणि उत्कट भावनेने पाहिले तर, त्यामधील सत्य काय आहे हे तुम्ही शोधून काढू शकता; त्यामध्ये कोणती आकांक्षा, अभीप्सा सुप्तपणे वसलेली आहे; कोणत्या दैवी प्रेरणेमध्ये, मानवी मन आणि मानवप्रणालीमुळे बदल होत आहेत, आणि कशाचे विरूपीकरण होत आहे हे तुम्हाला कळू शकते. योग्य अशा मानसिक भूमिकेतून बघितल्यास, धर्म त्याच्या आहे त्या स्थितीतदेखील तुमच्या मार्गावर काही प्रकाश टाकू शकतो आणि तुमच्या आध्यात्मिक प्रयासांना साहाय्य पुरवू शकतो.

प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला असे लोक आढळतात की, ज्यांची भावनिक क्षमता खूप मोठी असते आणि ते खरीखुरी, तळमळीची अभीप्सा बाळगत असतात, पण त्यांचे मन अगदी साधेसुधे असते आणि त्यांना ईश्वराकडे ज्ञानाच्या माध्यमातून जाण्याची गरज भासत नाही; अशा लोकांसाठी धर्माचा उपयोग होतो आणि त्यांच्यासाठी त्याची गरजदेखील असते. कारण बाह्य रूपांच्याद्वारा, उदाहरणार्थ चर्चमधील समारंभ इ. द्वारे त्यांच्या आंतरिक आध्यात्मिक आकांक्षेला एक प्रकारचे साहाय्य मिळते.

प्रत्येक धर्मामध्ये उच्च आध्यात्मिक जीवन ज्यांच्यामध्ये उदित झाले आहे अशा काही व्यक्ती असतात परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की, त्यांच्या धर्माने ही आध्यात्मिकता त्यांना प्रदान केलेली असते, उलट त्यांनीच त्यांच्या आध्यात्मिकतेद्वारे धर्मामध्ये भर घातलेली असते. अशा व्यक्तींना कोठेही ठेवले असते, त्यांचा जन्म कोणत्याही संप्रदायामध्ये झाला असता, तरी त्यांनी तेथेही अशाच आध्यात्मिक जीवनाचा शोध घेतला असता आणि असेच आध्यात्मिक जीवन व्यतीत केले असते. ती त्यांची स्वत:ची क्षमता असते, त्यांच्या अंतरात्म्याची ती एक प्रकारची शक्ती असते; मात्र त्यांची अशी जडणघडण धर्मामुळेच झाली आहे असा दावा धर्म करत असतो; पण वस्तुस्थिती मात्र तशी नसते. त्यांच्या प्रकृतीमधील या शक्तीमुळेच धर्म हा त्यांच्यासाठी गुलामी वा बंधन बनत नाही. एवढेच की, त्यांच्याकडे शक्तिशाली, सुस्पष्ट आणि सक्रिय मन नसल्यामुळे, त्यांना ह्या वा त्या संप्रदायाला निरपवाद सत्य म्हणून मानण्याची आणि कोणतेही विरोधी प्रश्न वा शंका मनात उठू न देता, स्वत:ला एखाद्या संप्रदायाला नि:शेषतया समर्पित करण्याची आवश्यकता भासते. मला प्रत्येक धर्मामध्ये अशा प्रकारची माणसे भेटलेली आहेत. आणि अशा लोकांच्या श्रद्धेला धक्का लावणे हा गुन्हा आहे. त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा नसतो.

परंतु जे याहूनही पुढे जाऊ शकतात, चैतन्याच्या मार्गावर जे एका विशिष्ट अंतरापर्यंत वाटचाल करू शकतात, त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा ठरतो, पण जे असे पुढे जाऊ शकत नाहीत त्याच्यांसाठी धर्म हा साहाय्यकारी ठरतो.

उत्तमोत्तम तसेच अगदी निम्न बाबींबाबत देखील धर्माचा आवेग आढळून येतो. एका बाजूला धर्माच्या नावाने तुंबळ युद्ध झाली आहेत आणि अगदी हिडीसपणे जाचदेखील झालेला आहे, पण त्याचबरोबर स्वार्थत्याग आणि सर्वोच्च धैर्यालाही तो पोषक, प्रेरक ठरलेला आहे. कोणत्या उच्चतर कृतींपर्यंत मानवी मन जाऊन पोहोचू शकते ह्याची मर्यादा तत्त्वज्ञानाप्रमाणेच धर्मानेही दाखवून दिली आहे. तुम्ही जर धर्माच्या बाह्य देहाचे गुलाम झालात तर, तुमच्यासाठी तो खोडा वा बेडी बनेल, पण जर तुम्हाला त्यांतील आंतरतत्त्व कसे उपयोगात आणावयाचे हे माहीत असेल तर चैतन्याच्या अधिराज्यामध्ये झेपावण्यासाठी धर्म ही उपयुक्त अशी उड्डाणफळी (jumping-board) बनेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 78-79)