जो जो कोणी श्रेष्ठता प्रकट करण्याचा संकल्प करील, एकामागून एक डोंगर चढत ईश्वरी शिखर गाठण्यास पुढे सरसावेल तो ‘आर्य’ होय. त्याला भीतीचा लवलेशही कधी स्पर्श करीत नाही. परागती वा अपयश त्याला आपल्या ध्येयमार्गापासून विचलित करू शकत नाहीत. जो कोणी ह्याची निवड करतो, जो कोणी दिव्यत्वाची शिखरे एका पाठोपाठ एक सर करण्याचा यत्न करतो, जो कशासही घाबरत नाही, पिछेहाट किंवा पराजयाने ज्याची गती अवरूद्ध होत नाही, स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या खूप पलीकडे, अति व्यापक आहे म्हणून त्या व्यापकतेपासून, विशालतेपासून जो अंग चोरून घेत नाही, स्वत:च्या जीवाच्या मानाने एखादी गोष्ट खूप उच्च पातळीवर आहे असे पाहून जो त्या उंचीमुळे दडपून जात नाही, स्वत:च्या शक्तीच्या आणि धैर्याच्या मानाने एखादी गोष्ट खूपच महान आहे म्हणून त्या महानतेपासून जो दूर पळत नाही, तो आर्य होय; तो दिव्य योद्धा आणि विजेता, उदात्त मानव आहे, तो उच्चकुलीन, श्रेष्ठ, गीतेत वर्णिलेला ‘श्रेष्ठ’ आहे.
आर्य ह्या शब्दाचा मूळ अर्थ प्रयत्न, उत्थान आणि विजय असा आहे. मानवी प्रगतीच्या विरूद्ध येणाऱ्या सर्व आंतरिक प्रवृत्ती व बाह्य परिस्थिती ह्यांविरुद्ध लढून त्यांच्यावर जो विजय मिळवतो तो आर्य! ‘आत्मविजय’ हा त्याच्या प्रकृतीचा पहिला कायदा आहे. तो पृथ्वी व शरीर ह्यांवर विजय मिळवितो आणि अन्य सामान्य माणसांप्रमाणे आळस, प्रमाद, चाकोरी इत्यादी तामसिक मर्यादांमध्ये राहण्यास आपल्या शरीरास संमती देत नाही. नाना इच्छा, भुका व अन्य रजोगुणात्मक वासना ह्यांच्या गुलामीत तो आपले जीवन वा जीवनशक्ती जखडू देत नाही. तो मनोविजय प्राप्त करतो. तो मन आणि त्याच्या सवयी यांच्यावर मात करतो. तो अज्ञान, परंपरागत पूर्वग्रह, रुढीबद्ध कल्पना, सुखद मते यांच्या कवचामध्ये राहत नाही; तर ठाम आणि दृढ अशी इच्छाशक्ती स्वत:कडे असूनदेखील, बुद्धि विशाल आणि लवचीक कशी बनेल ह्याचा तो शोध घेत असतो, निवड करीत असतो. प्रत्येक गोष्टीत तो सत्याचा वेध घेत असतो, प्रत्येक गोष्टीतील योग्य, प्रत्येक गोष्टीतील सर्वोच्च आणि स्वातंत्र्य यांचा तो शोध घेत असतो.
आत्मसिद्धी हे त्याच्या आत्मविजयाचे ध्येय असते. तो ज्या ज्या गोष्टीवर विजय संपादन करतो ती ती गोष्ट तो नष्ट करीत नाही; तर तिला उदात्तता व पूर्णता प्राप्त करून देतो. शरीर, प्राण व मन ही साधने आहेत आणि त्या साधनांच्या अतीत असणाऱ्या उच्चतर गोष्टींच्या प्राप्तीसाठी ती आपणास देण्यात आली आहेत, हे तो जाणतो; आणि त्यामुळे त्यांच्यावर मात करून, त्यांच्या अतीत जाणेच आवश्यक आहे, त्यांच्या मर्यादा नाकारणेच आवश्यक आहे, त्यांची पुष्टीतुष्टी करण्यातील मग्नता टाळणेच आवश्यक आहे, हे तो जाणतो. भलेही कनिष्ठ जीवनाने ह्या शोधकावर, साधकावर काही अटी, मर्यादा लादलेल्या असल्या तरी, एकदा का ही परमोच्च अवस्था त्याने प्राप्त करून घेतली की, त्याने काय करणे अपेक्षित आहे हे तो जाणतो.
परमोच्च अवस्था म्हणजे या जगातून निघून जाणे, नाहीसे होणे नव्हे तर, ईश्वरी संकल्प, चेतना, प्रेम, सौंदर्य जे ह्या शोधकाद्वारे, साधकाद्वारे ओसंडून बाहेर पडू पाहते, त्या साऱ्याची चढत्यावाढत्या प्रमाणामध्ये त्याने अभिव्यक्ती करणे; सभोवती असणाऱ्यांपैकी जे कोणी स्वीकारक्षम आहेत त्यांच्यावर त्या साऱ्याचा वर्षाव करणे. आर्य हा त्या परमोच्च शक्तीचा सेवक, भक्त, उपासक व साधक असतो. आत्मसिद्धी प्राप्त झाल्यावर आपल्या सर्व कर्मातून अखिल मानवजातीवर तो प्रेम, आनंद व ज्ञान ह्यांचा वर्षाव करीत राहतो. कारण आर्य हा सदैवच एक कर्मयोगी व योद्धा असतो. परमेश्वराची प्राप्ती व सेवा ह्यांमध्ये कोणत्याही अडचणीस तो जुमानत नाही वा थकल्यामुळे त्याच्या कामात कधी मंदपणा येत नाही. त्याच्या जीवनांत मनाशी व जगाशी अंतर्बाह्य युद्ध करण्याचा प्रसंग सदैवच हजर असतो. तो आपले स्वराज्य व साम्राज्य सदैव स्थापन करीत व वाढवीत असतो. स्वत:च्या आतल्या स्वराज्यासाठी आणि बाहेरील साम्राज्यासाठी तो सदैव झुंज देत राहतो.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 442-443)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२९ - January 21, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२८ - January 20, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२७ - January 19, 2025