पूर्णयोगाच्या साधकाची ईश्वरप्राप्तीसाठीची जी धडपड चालू असते त्या कक्षेतून, स्वत:च्या जीवनामध्ये तसेच स्वत:च्या अस्तित्वाच्या व विश्वात्मक पुरुषाच्या सर्व गतीविधींद्वारे ईश्वराला भेटणे हेही समाविष्ट असेल. निसर्ग व जीवन हे त्याच्यासाठी ईश्वराला भेटण्याचे संकेतस्थळही असेल आणि त्याचबरोबर ते त्याच्यासाठी त्या ईश्वराचे प्रकटीकरणदेखील असेल.

बौद्धिक, कलात्मक व गतियुक्त व्यवहार, विज्ञान, तत्त्वज्ञान, जीवन, विचार, कला आणि कर्म या गोष्टी ईश्वराच्या अनुमतीने चालतात आणि त्यामध्ये अधिक खोल गर्भितार्थ दडला असल्याचे त्याच्या लक्षात येते. ह्या साऱ्या माध्यमांमधून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचे तो स्पष्ट दर्शन घेऊ शकतो आणि त्या साऱ्यामध्ये असणाऱ्या ईश्वराचा आनंद त्याला लाभतो म्हणूनच तो त्यांच्या प्राप्तीसाठी धडपड करतो. हा साधक या गोष्टींच्या बाह्य रूपांविषयी आसक्ती धरणार नाही; कारण आसक्ती ही आनंदाच्या मार्गातील धोंड असते. त्याला असा एक शुद्ध, समर्थ आणि परिपूर्ण आनंद मिळत असतो, की ज्या आनंदामध्ये सर्वकाही समाविष्ट असते परंतु तो आनंद दुसऱ्या कशावरच अवलंबून नसतो. आणि त्याला त्या सर्वांमध्ये त्याच्या प्रियकराच्या म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा, त्याची प्रतीके, त्याचे अस्तित्व, त्याच्या खुणा, त्याच्या कृती सापडतात. केवळ कलेसाठीच कलेची साधना करू पाहणाऱ्या सामान्य मनाला कदापिही मिळणार नाही वा त्याची कल्पनादेखील ते करू शकणार नाही असा व एवढा आनंद या भक्ताला त्या गोष्टींमधून होतो. ते सर्व काही आणि त्याहूनही अधिकचे असे सर्व काही हे त्याच्यासाठी पूर्णयोगाचा आणि समावेशनाचा मार्ग ठरतो.

प्रेम ही ह्या आनंदाची सर्वत्रगत शक्ती असते. आणि त्या प्रेमाचा आनंद जे विशिष्ट रूप धारण करतो ती असते, सौंदर्याची दृष्टी !

ईश्वराचा प्रेमिक हा विश्वाचा प्रेमी असतो आणि तो ‘सर्व-आनंदमया’ला आणि ‘सर्व-सौन्दर्यमया’ला प्रेमाने कवळतो. जेव्हा वैश्विक प्रेम हे साधकाच्या हृदयाचा ताबा घेते तेव्हा, ईश्वराने त्याला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. आणि जेव्हा साधकाला सर्वत्र सर्व-सौंदर्य पाहण्याची दृष्टी येते आणि सदा सर्वकाळ आनंदाने त्याला कवळून घेतले आहे असा त्याला अनुभव येत राहतो, तेव्हा साधकाने ईश्वराला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. प्रेमाची परिपूर्ती ऐक्यामध्ये होणे आणि परस्परांनी परस्परांना कवळून घेणे ही एकाच वेळी सर्वोच्च अशी अवस्था पण असते आणि तेव्हाच त्या प्रेमाची तीव्रताही अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली असते. आणि हेच ऐक्यातील परमानंदाचे अधिष्ठान असते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 591-592)

श्रीअरविंद