प्रत्येक मनुष्य जाणताअजाणता विश्वशक्तीचे साधन असतो; एखाद्याला त्याच्या अंतरंगात विश्वशक्तीची उपस्थिती असल्याचे ज्ञान असते; इतरांच्या ठिकाणी हे ज्ञान नसते; हाच काय तो माणसामाणसांत भेद असतो. कृतीकृतीत वा साधना साधनामध्येही काही सारभूत भेद नसतो, म्हणून साधनत्वाचा अहंकारी अभिमान बाळगणे हा मूर्खपणा आहे.

ज्ञान व अज्ञान यात अंतर आहे; हे खरे आहे; परंतु हे अंतर परमात्म्याच्या कृपेचे निदर्शक असते; दिव्य ईश्वरी शक्ती आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार विहरत असते; आणि आज एका माणसात तर उद्या दुसऱ्या माणसात आपला शब्द किंवा शक्ती, सामर्थ्य भरत असते.

कुंभार एखादे मडके दुसऱ्या एखाद्या मडक्यापेक्षा अधिक चांगले बनवतो; याठिकाणी श्रेय त्या मडक्याला नाही, तर मडके घडविणाऱ्याला हे श्रेय आहे. हीच गोष्ट ज्ञान-अज्ञान कमीअधिक असलेल्या माणसाच्या संबंधात समजावी.

“ही माझी शक्ती आहे” किंवा ”ईश्वराची शक्ती माझ्यामध्ये किती आहे पाहा” अशी आपल्या मनाची वृत्ती नसावी. आपल्या मनाची वृत्ती पुढीलप्रमाणे असावी : ”या माझ्या मनात व शरीरात ईश्वरी शक्ती काम करीत आहे, सर्व माणसात जी काम करते, तीच ईश्वरी शक्ती माझ्यात काम करीत आहे; सर्व प्राण्यांत, वनस्पतींमध्ये, धातुंमध्ये जी काम करते, तीच ईश्वरी शक्ती माझ्यामध्ये काम करीत आहे; जाणीवयुक्त आणि प्राणयुक्त वस्तूमध्ये आणि अचेतन प्राणशून्य दिसणाऱ्या वस्तूमध्ये जी ईश्वरी शक्ती काम करते, तीच माझ्यामध्ये काम करीत आहे.”

ही दृष्टी, ही वृत्ती आमच्या अनुभवाला सर्वत्र व्यापून राहिली, तर आमचा राजसिक अहंकारदेखील आमच्यातून नाहीसा होण्यास या वृत्तीची खूप मदत होईल आणि आमचा सात्विक अहंकारदेखील आमच्या प्रकृतीतून निघून जाण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 250)

श्रीअरविंद