क्रांतिकारक श्री अरविंद घोष यांच्या जीवनातील ही कहाणी.

ब्रिटिशविरोधी कारवाईमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून त्यांना दि. ०२ मे १९०८ रोजी अटक करण्यात आली. अलिपूरच्या तुरुंगात त्यांना एक वर्षभर राहावे लागणार होते. बळजबरीच्या ह्या एकांतवासामध्ये, दिवस घालविण्यासाठी कोणतेच साधन तेव्हा त्यांच्या हाताशी नव्हते. बाहेर असताना एक क्षणही न दवडता, अखंड कार्यरत असणारे अरविंद घोष, स्थानबद्ध झाल्यावर एकदम निर्माण झालेल्या पोकळीने मात्र काहीसे अस्वस्थ झाले होते.

काही दिवस अशा रीतीने अस्वस्थतेमध्ये घालविल्यानंतर, एके दिवशी दुपारी ते विचार करत बसले असताना, विचारांचा ओघ अनिर्बंधपणे वाहू लागला आणि त्यांना जाणीव झाली की, हे विचार अनियंत्रितपणे, असुसंगत रीतीने येऊन आदळत आहेत. हे प्रमाण इतके वाढले की, त्यांना वाटू लागले की, मनाची नियंत्रणक्षमताच जणू नाहीशी झाली आहे. आता भ्रमिष्टच होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली.

श्रीअरविंद म्हणतात, “माझी बुद्धी गमावण्यापासून माझे रक्षण कर, अशी मी त्यावेळी अगदी उत्कटतेने, आर्ततेने ईश्वराची प्रार्थना केली, त्याची करूणा भाकली. त्याच क्षणी माझ्या सर्वांगावरून एक अतिशय हळूवार, थंडगार झुळूक वाहत गेली, माझे भणाणलेले मस्तक विश्रांत पावले. एखादे तान्हे मूल जसे त्याच्या आईच्या कुशीत निश्चित, निर्धास्तपणे झोपी जावे, तसा मी देखील मग विश्वमातेच्या कुशीत निर्धास्तपणे झोपी गेलो.

संपूर्ण जीवननाट्याकडे एखाद्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून कसे पाहावयाचे हेच माझ्या बुद्धिला या प्रसंगातून त्या ईश्वराने शिकविले होते. त्या दिवसापासून कारावासातील माझे सर्व त्रास संपूनच गेले.

या प्रसंगामधून मला प्रार्थनेची परिणामकारकता आणि प्रार्थनेची असामान्य शक्ती ह्यांची जाणीव झाली.”

-आधार : (Tales of Prison Life)

अभीप्सा मराठी मासिक