दैवगती अटळ आहे असे समजून, भौतिक जीवन, ज्याच्या त्याच्या नशिबानुसार आहे तसेच सोडून देण्याची एक पळवाट म्हणजे पूर्णयोग नव्हे; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही पूर्णयोग नव्हे, किंवा विश्व हे ईश्वरी इच्छेचे ‘अंतिम’ आविष्करण आहे असे मानून, विश्वाचा स्वीकार करणे म्हणजेही पूर्णयोग नव्हे.
अगदी सर्वसामान्य मानसिक चेतनेपासून ते अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या जाणिवांच्या सर्व श्रेणी चढत चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येऊन, प्राप्त करून घेतलेली ती अतिमानसिक शक्ती आणि चेतना, पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतूने, या भौतिक विश्वामध्ये भरून टाकणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.
मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण ह्या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते ह्या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी पूर्णयोग आहे.
ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच पूर्णयोगासाठी तयारी झालेली असते.
ज्यांना मनुष्यप्राण्याच्या भवितव्याची काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :
मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते ?
दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते ?
वियोग जर होणारच आहे तर व्यक्ती प्रेमच का करते ?
भ्रमिष्ट होण्यासाठीच का व्यक्ती विचार करते ?
चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते ?
*
ह्याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर असे आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. परंतु हा विरोधाभास अटळ आहे असे नाही, तर तो सुधारण्याजोगा आहे आणि एक ना एक दिवस तो विरोधाभास नाहीसा होईलच. जग जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.
ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या जाणिवेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एव्हढेच नाही तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळ संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)
- रूपांतरण हे उद्दिष्ट - May 27, 2022
- त्रिविध तपस्या - May 26, 2022
- आत्म-प्राप्ती हेच रहस्य - May 17, 2022