भारतांत अद्यापहि ज्या प्रमुख योगशाखा प्रचलित आहेत त्यांच्या विशिष्ट संकीर्ण प्रक्रिया बाजूस ठेवून त्यांच्या केंद्रवर्ती तत्त्वावर जर आम्ही जोर दिला, तर त्यांची एक चढती शिडी होते असे आम्हांस दिसते. या शिडीची अगदी खालची पायरी शरीर आहे, आणि वैयक्तिक आत्मा व विश्वातीत विश्वरूप आत्मा यांचा प्रत्यक्ष संबंध घडविणारा योग ही या शिडीची सर्वात वरची पायरी आहे.
हठयोग हा शरीर व प्राणकार्ये ही पूर्णत्व आणि साक्षात्काराची साधने म्हणून पसंत करतो; स्थूल शरीर हे हठयोगाचे कार्यक्षेत्र आहे. राजयोग हा भिन्न अंगांनी युक्त असलेले आपले मनोमय अस्तित्व उत्थापन-साधन म्हणून निवडतो; तो सूक्ष्म शरीरावर आपले लक्ष केंद्रित करतो.
कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हा त्रिमार्ग मनोमय पुरुषाची इच्छाशक्ति, हृदय (भावनाशक्ति) किंवा बुद्धिशक्ति घेऊन आरंभ करतो, आणि या शक्तींचे रूपांतर घडवून मोक्षद सत्य (liberating Truth), आनंद व अनंतता या आध्यात्मिक जीवनाच्या अंगभूत गोष्टी प्राप्त करून घेतो. व्यक्तिशरीरांतील मानवी-पुरुष (आत्मा) आणि प्रत्येक शरीरांत राहणारा सर्व नामरूपांच्या अतीत असणारा दिव्य-पुरुष (आत्मा) यांजमध्ये प्रत्यक्ष व्यवहार घडविणे ही या त्रिमार्गाची पद्धत आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 33)
- श्रीमाताजी आणि समीपता – ११ - May 2, 2025
- श्रीअरविंद आणि मराठी माणसांचा अनुबंध - April 24, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – ०४ - April 22, 2025