ज्ञानमार्ग हा, परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’कडे, वाटचाल करतो, सारासारविवेकाकडे वाटचाल करतो. ज्ञानमार्ग आमच्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या घटकांपैकी प्रत्येक घटक घेऊन, अमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, तमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, (नेति, नेति) याप्रमाणे प्रत्येक घटकाची आत्म्याशी एकरूपता नाकारतो व त्या सर्वांना आत्म्यापासून दूर करून, हे घटक प्रकृतीचे घटक आहेत, नामरूपात्मक प्रकृतीचे घटक आहेत, मायेची – नामरूपात्मक जाणिवेची निर्मिती आहे असे म्हणतो; त्यांना आत्म्यापासून निराळे करून एका सर्वसामान्य वर्गात घालतो; प्रकृति, माया असे सर्वसामान्य नाव देतो.

याप्रमाणे ज्ञानमार्गी साधक शुद्ध एकमेव परमश्रेष्ठ आत्म्याशी आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. हा आत्मा अविकारी, अविनाशी असून त्याच्या लक्षणांत कसलेही रूप, कसलीही घटना येत नाही. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यतः नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम समजून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत जगाच्या संसारात येत नाही.

तथापि, हें कैवल्य, केवल पूर्णत्व हा ज्ञानमार्गाचा एकमेव अथवा अटळ परिणाम नाही. साधक वैयक्तिक ध्येयाकडे कमी लक्ष देऊन मानवतेच्या हिताकडे, सर्वभूतांच्या हिताकडे अधिक लक्ष देत असेल, तर ज्ञानमार्गानें तो विश्वातीत तत्त्वात विलीन होऊ शकत असला तरी, आपल्या पराक्रमानें तो विश्वाचा संसार ईश्वराकरतां जिंकून घेईल. परमात्मा केवळ आपल्या स्वत:च्या अस्तित्वातच नव्हे, तर सर्व जीवाजीवांत आहे, तसेच जगाच्या नामरूपात्मक घटना ईश्वरी जाणिवेच्याच लीला आहेत, त्या या जाणिवेच्या खऱ्या स्वरूपाला सर्वस्वी परकीय नाहीत ही अनुभूति मात्र साधकाला मिळाली असली पाहिजे.

या अनुभूतीच्या बळावर ज्ञानाचे सर्व प्रकार, मग ते कितीहि लौकिक असोत, ते हातांत घेऊन त्यांना ईश्वरी जाणिवेच्या व्यापारांचे रूप देता येईल; आणि ज्ञानाचा एकमेव अद्वितीय विषय स्व-रूपाने कसा आहे व त्याच्या आकारांच्या व प्रतीकांच्या लीलेत कसा दिसतो हीहि अनुभूती येईल. ज्ञानमार्गाची या प्रकारची वाटचाल मानवी बुद्धीचे व प्रतीतीचे सर्व क्षेत्र उंचावून दिव्य करू शकेल, आध्यात्मिकता-संपन्न करू शकेल; आणि मानवता ज्ञानासाठी विश्वभर जो अतीव परिश्रम घेत आहे तो योग्यच आहे असे त्यायोगे ठरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 38)

श्रीअरविंद