आपण केलेले एखादे कृत्य हे वाईट, ओंगळ होते हे दिसण्यासाठी, समजण्यासाठी मनुष्य एका उंचीवर पोहोचला पाहिजे. त्याला आंत गाभ्यात कोठेतरी सौंदर्य, उदात्तता, उमदेपणा या गोष्टींची पूर्वप्रचिती आलेली असावी लागते, तरच त्याला ह्या गोष्टींच्या अभावामुळे सहन करावे लागणारे दुःख नेमके काय असते ह्याची कल्पना येऊ शकते.

मला वाटते, सुंदर काय, उदात्त काय हे माहीत असूनही जे लोक जाणूनबुजून, मुद्दाम वाईट वागतात, त्यांच्यासाठी जीवन हे खरोखरच वेदनामय ठरते. काय करू नये ते माहीत असतानासुद्धा, एकसारखे तीच गोष्ट करत राहावयाची तर त्याच्या मोबदल्यात, शांती, स्वास्थ्य, ह्याची किंमत मोजावी लागणारच.

जो खोटे बोलतो तो त्याचे पितळ कधीतरी उघडे पडेल या भीतीखाली सतत वावरत असतो. जो चुकीचे वागला आहे तो सतत ह्या चिंतेत असतो की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा तर होणार नाही ना. जो दुसऱ्याला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला त्याची चोरी उघडकीला येईल की काय ह्याची कायमच धास्ती वाटत असते.

वास्तविक अगदी पूर्ण स्वार्थी दृष्टीने पाहिले तरीसुद्धा सत्कृत्य करणे, न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत आणि समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि या उपर, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल, कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्माने तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; जर तुम्ही केलेली कर्मे ही सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमतः निराशाच पदरी पडणार.

आपले स्वत:चेच वातावरण सदोदित आपल्या सोबत असते

…जेव्हा तुम्ही सदाचारी असता; उदार, उदात्त, नि:स्वार्थी, दयाळू असता, त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये व तुमच्याभोवती एक विशिष्ट वातावरण निर्माण करीत असता. हे वातावरण म्हणजे एक प्रकारची प्रकाशमय अशी मुक्ती असते. सूर्यप्रकाशात बहरून येणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही खुलून येता, त्याच प्रकाशमयतेमध्ये श्वासोच्छ्वास करता. त्यामुळे जीवनात कोणतीही कटुता, विद्रोह, क्लेश, दुःखद प्रतिघात तुमच्यावर होत नाहीत. अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्या भोवतालचे वातावरण प्रकाशमय होते आणि ज्या हवेत तुम्ही श्वासोच्छ्वास करता ते वातावरण आनंदमय होऊन जाते. देहामध्ये असताना किंवा देहातून बाहेर गेल्यावरही, जागृती किंवा निद्रेमध्ये, जीवनामध्ये किंवा मरणोत्तर नवीन जन्म मिळेपर्यंतच्या जीवनातही तुम्ही त्याच वातावरणात जगता.

छिन्नविछिन्न करून टाकणाऱ्या वाऱ्याप्रमाणे, गोठवून टाकणाच्या थंडीप्रमाणे, किंवा भस्मसात करून टाकणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे, दुष्कृत्ये ही मनुष्याच्या जाणिवेवर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात.
सर्व सत्कृत्ये, शुभ कर्म ही जीवनात प्रकाश, स्वास्थ्य, आनंद आणि पुष्पविकासी सूर्यप्रकाश भरत असतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 199-200)